10 जुलै रोजी होणार शिक्कामोर्तब

0

मुंबई । माजी कर्णधार आणि फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर संघाच्या नव्या प्रशिक्षकासाठी शोधमोहिम सुरु करण्यात आली होती. बीसीसीआयकडे दाखल करण्यात आलेल्या अर्जांमधून संभाव्य 10 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. या दहाजणांमध्ये रवि शास्त्री, क्रेग मॅकडरमॉट, लांस क्लूसनर, राकेश शर्मा (ओमानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक), लालचंद रजपूत, फिल सिमंस, टॉम मूडी, दोडा गणेश रिचर्ड पायबस आणि उपेंद्रनाथ ब्रम्हचारी ( व्यवसायाने तंत्रज्ञ, क्रिकेट खेळल्याचा काहीच अनुभव नाही) यांचा समावेश आहे. मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात सोमवारी, 10 जुलैरोजी दुपारी 1 वाजल्यापासून उमेदवारांच्या मुलाखती सुरु होणार असल्याची चर्चा आहे. त्यावेळी सेहवाग, शास्त्री, पायबस, रजपूत, सिमंस आणि मूडी यांच्या मुलाखती होतील. सल्लागार समितीने लांस क्लूसनर याचे नाव राखून ठेवले असले तरी त्याला संधी मिळण्याची फार कमी शक्यता आहे. बीसीसीआयने प्रशिक्षक निवडायची जबाबदारी क्रिकेट सल्लागार समितीवर सोपवली आहे. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस लक्ष्मण या समितीचे सदस्य आहेत. ही समिती त्यांच्याकडे आलेल्या अर्जांचा विचार करुन मुलाखत न घेताच नाव घोषीत करु शकते अशी माहिती सूत्रांनी दिली. 26 जुलैपासून भारतीय संघाच्या श्रीलंकेच्या दौर्‍याला सुरुवात होणार आहे. त्याआधीच संघासाठी प्रशिक्षक नेमण्यात येणार आहे.

सोमवारी प्रशिक्षकपदासाठी होणार्‍या मुलाखती रद्द होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. मात्र मागीलवेळी झालेल्या शास्त्री- गांगुली वादाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुलाखतीची प्रक्रियाच टाळण्याचा बीसीसीआयमधील काही पदाधिकार्‍यांचे प्रयत्न आहे. प्रशिक्षकपदासाठी इच्छुक उमेदवारांनी संघासाठी आगामी योजना, नियोजन याचे सादरीकरण अर्जासोबत
जोडलेले आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा तेच बघण्याची आवश्यकता नाही अशी बीसीसीआयच्या पदाधिकार्‍यांची भूमिका आहे. याशिवाय शास्त्री, टॉम मूडी, सेहवाग या आघाडीवर असलेल्या उमेदवारांची कार्यशैली माहित असल्यामुळेही मुलाखती टाळण्यावर जोर दिला जात आहे. मात्र एकुण निवड प्रक्रिया कशी असेल याबाबत कुठल्याही उमेदवाराला रविवारपर्यंत माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे सोमवारी 1 वाजता सुरू होणार्‍या क्रिकेट सल्लागार समितीच्या बैठकीत अनुभवी सहा उमेदवारांच्या मुलाखती होण्याची शक्यता आहे. याशिवाय मुलाखतींना फाटा देऊन क्रिकेट सल्लागार समिती नवीन प्रशिक्षकाचे नाव थेट जाहीर करू शकते.

शास्त्रींनी मागितले होते आश्‍वासन
याआधीही भारतीय क्रिकेट संघासमोबत काम केलेल्या रवी शास्त्री यांनी यावेळी सुरुवातीला आपला अर्ज दाखल केला नव्हता. बीसीसीआय प्रशिक्षकपदाची खात्री देत असेल तरच अर्ज दाखल करु अशी भूमिका शास्त्री यांनी घेतली होती. प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत सामील होण्याचा प्रश्‍नच येत नाही असे त्यावेळी शास्त्री म्हणाले होते. मधल्या काळात सचिन तेडुलकरने लंडनमध्ये शास्त्री यांची समजुत काढली होती.त्यानंतर शास्त्रींनी आपला उमेदवारी अर्ज बीसीसीआयला दिला.शास्त्री यांच्या निवडीची केवळ औपचारीकता शिल्लक असल्याचे बोलले जात आहे.

अनिल कुंबळे-विराट कोहली वाद
भारतीय संघाचे प्रशिक्षकपद स्विकारल्यानंतर कुंबळे आणि कर्णधार विराट कोहलीमध्ये कुरबरी घडत होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान या कुरबुरींना व्यापक स्वरुप मिळाले. त्याची परिणीती अनिल कुंबळे यांनी चॅम्पियन्स ट्राफीच्या अंतिम सामन्यातनंतर 20 जून रोजी दिलेल्या राजीनाम्यात झाली. कोहलीशी झालेल्या वादांमुळेच कुंबळेने राजीनामा दिल्याचे जगजाहिर झाले. कुंबळे यांचा कार्यकाळ एक वर्षाचा होता. पण भारतीय सघाच्या वेस्टइंडिज दौर्‍यामुळे त्यात वाढ करण्यात आली होती.

रवी शास्त्रीचे नाव आघाडीवर आहे. सचिन, गावसकर यांचा पाठिंबा आणि कोहलीचीही पसंती असल्यामुळे शास्त्री यांची निवड पक्की समजली जात आहे. पण यात सौरव गांगुली अडसर ठरू शकतो. मागील वेळी प्रशिक्षक निवडी दरम्यान शास्त्री आणि गांगुलीमध्ये वाद निर्माण झाला होता. शास्त्रींची निवड झाल्यास भारत अरूण भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक होऊ शकतात.

वीरेंद्र सेहवागचे नावही चर्चेत आहे. गांगुलीने रवी शास्त्रीला विरोध केल्यास त्याचा फायदा सेहवागला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा दोन वर्ष मेंटॉर म्हणून काम करत असताना सेहवागला छाप पाडता आली नाही. सेहवागला बीसीसीआयच्या अधिकार्‍यांचा पाठिंबा आहे.

बीसीसीआयकडे प्रशिक्षकपदासाठी 10 अर्ज आले होते. त्यातील लांस क्लूसनर कडे दक्शिण आफ्रिकेतील लीगस्पर्धेमधील एका संघाच्या प्रशिक्षकपदाचा अनुभव आहे. फिल सिमंसकडे अफगणीस्तान, आयर्लंड सारख्या छोट्या देशांच्या प्रशिक्शकपदाचा अनुभव आहे. संघ निवडीवरुन विंडीज क्रिकेट बोर्डाशी झालेला सिमंस याचा वाद गाजला होता.

गांगुली शास्त्री वाद
मागील वेळेस प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीवरुन सौरव गांगुली आणि रवी शास्त्री यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यावेळी दोघांमध्ये घडलेल्या शाब्दीक चकमकीमुळे हा वाद चव्हाट्यावर आला होता. प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांनी स्काईपच्या माध्यमातून टेली इंटरव्ह्यू दिला होता. त्यावेळी सौरव गांगुली तिथे उपस्थित नव्हते. त्यामुळे शास्त्री यांनी मुलाखतीचे गांभीर्य ओळखून व्यक्तिशा हजर रहायला पाहिजे होते असे विधान गांगुली यांनी केले होते. गांगुलीच्या या विधानामुळे दोघांमध्ये चांगलाच कलगीतुरा घडला होता. हा वाद चव्हाट्यावर आल्यामुळे बीसीसीआयच्या पदाधिकार्‍यांनी नाराजी व्यक्त केली होती. आता पुन्हा रवी शास्त्री-गागुंली समोरासमोर येणार असल्याने पुन्हा वाद निर्माण होऊ
नये अशी काळजी बीसीसीआय घेत आहे.