10 ते 13 जानेवारीला विश्‍व वेद विज्ञान संमेलन

0

जुन्नर । महाराष्ट्र सरकार, विज्ञान भारती, डेक्कन कॉलेज अभिममत विद्यापीठ आणि गोवा सरकारच्या वतीने तिसरे विश्‍व वेद विज्ञान संमेलन 10 ते 13 जानेवारी या कालावधीत डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आले आहे.वेद विज्ञान सृष्टी या प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार 10 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. शिक्षणविषयक सभेची सुरुवात दुपारी 11 वाजता करण्यात येणार असून शाखानिहाय चर्चा होणार आहेत. दुपारी 4 वाजता वेदिक विज्ञान व आधुनिक विज्ञान या कार्यक्रमात डॉ. विजय भटकर मार्गदर्शन करणार असून डॉ. विश्‍वनाथ कराड अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. संध्याकाळी 7 वाजता आनंदमुर्ती गुरू मा यांचे प्रवचन होणार आहे.

दुसर्‍या दिवशीच्या सत्रांचे उद्घाटन गुरुवारी सकाळी 10 वाजता प्रा. वसंत शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. माजी केंद्रीय मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी व स्वामी तेजोमनयानंद मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. विजय भटकर, जयंत सहस्त्रबुध्दे, सुरेश सोनी, प्रा. ए. पी. जामखेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दुपारच्या सत्रांमध्ये शास्त्र व तत्वज्ञान, योगा, पुरातत्व, वेदा व इलेक्टॉनिक्स, कृषी व गोविज्ञान, मानव आणि समाज शास्त्र, कला व विज्ञान या विषयांची स्वतंत्र चर्चासत्रे होणार आहेत. वेद आणि शाश्‍वत विकास या विषयावर परिसंवाद होणार आहे. शुक्रवारी 12 जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता सूर्यनमस्कार सहपरिवार हा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी 13 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता प्रा. एम. के. ढवळीकर यांचे पुरातत्वविज्ञान या विषयावरील व्याख्यान होणार व अन्य कार्यक्रम होणार आहेत.