10 दिवसापासून पाणी नसल्याची पोलीस कॉलनीतील नागरिकांची तक्रार

0

महापौरांनी केली टँकरची व्यवस्था

जळगाव: शहरातील सुप्रीम कॉलनीजवळ असलेल्या पोलीस कॉलनीत गेल्या 10 दिवसापासून पाणी येत नसल्याची तक्रार नागरिकांनी महापौर भारती सोनवणे यांच्याकडे केली. महापौरांनी तात्काळ संबंधित अधिकार्‍यांकडून माहिती घेत नागरिकांसाठी पाण्याच्या टँकरची व्यवस्था करून दिली.

तात्काळ बोलाविले पाणी टँकर
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत महापौरांनी त्यांना दिलासा देण्यासाठी मनपाच्या अग्निशमन विभागाला सूचना देत परिसरात टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. दिवसभरात शक्य होतील तेवढ्या फेर्‍या करून पाणी पुरविण्याच्या सूचना देत संबंधित नगरसेवकांना पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या.

सुप्रीम कॉलनीतील भाग असलेल्या पोलीस कॉलनीत पाणी नेहमी कमी दाबाने आणि उशिराने येत असते. शहरातील सर्व भागातील पाणीपुरवठा बंद असताना पोलीस कॉलनी वसाहतीला पाणी देणे शक्य होते. शनिवारी महापौर सुप्रीम कॉलनीत पाण्याच्या टाकीची पाहणी करायला गेल्या असता परिसरातील महिलांनी महापौरांची भेट घेत गेल्या 10 दिवसापासून पाणी येत नसल्याबाबत त्यांच्याकडे गार्‍हाणे मांडले.
महापौर भारती सोनवणे यांनी तात्काळ मनपाच्या अधिकार्‍यांना बोलावून याबाबत सविस्तर माहिती घेतली. पोलीस कॉलनीला आज पाणीपुरवठा होणार होता परंतु उमाळा परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने टाकी पूर्ण क्षमतेने भरू शकली नाही परिणामी पाणीपुरवठा होऊ शकला नसून दोन दिवसांनी पाणी पुरवठा करता येईल असे मनपा अधिकार्‍यांनी सांगितले.