यावल । शहरातील बाबा नगरातील ररहिवासी शकिलखान सुलतानखान यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी घरफोडीत करीत तब्बल 10 लाखांचा मुद्देमाल लांबवल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. धाडसी घरफोडीमुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली असून चोरट्यांनी पोलिसांच्या गस्तीलाच थेट आव्हान दिले आहे. चोरटयाने 85 हजारांची रोकड, 30 तोळ्याचे सोन्याचे दागीने, 750 गॅ्रम चांदीचे दागिने व 20 हजारांचे तीन मोबाईल लांबवले.
अशी झाली धाडसी घरफोडी
शहरातील खडकाई नदीच्या तिरावरील बाबानगरात शकिलखान सुलतानखान हे कुटूंबियांसह राहतात. बुधवारच्या मध्यरात्री नंतर व गुरूवारच्या पहाटेपूर्वी अज्ञात चोरट्यांनी सरकती खिडकी सरकवून खिडकी जवळील दरवाजा उघडून घरात प्रवेश केला व घरातील दोन्ही कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, तीन मोबाईल व 85 हजार रूपये रोख असा तब्बल 10 लाख 36 हजारांचा मुद्देमाल लंपास केला.
नदीपर्यंत श्वानाचा माग
या घटनेने भयभीत झालेले शकीलखान यांनी पहाटेच साडेचार वाजता पोलीस ठाणे गाठून घटनेचे वृत्त दिले. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक डी.के. परदेशी, सपोनि योगेश तांदळे, उपनिरिक्षक सुनीता कोळपकर, अशोक अहिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सकाळी श्वानपथक घटनास्थळी पोहचल्यानंतर श्वानाने नदीकाठापर्यंतचा मार्ग दाखवला.ठसे तज्ज्ञांनी ठश्यांचे नमूने घेतले. या घरफोडीमुळे शहरात एकचं खळबळ उडाली आहे. या प्रकरणी खान यांच्या फिर्यादी वरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपवास सोडण्यासाठी कुटुंब उठताच चोरी उघडकीस
बकरी इद निमित्ताने सध्या मुस्लीम बांधवांचे तीन दिवसीय उपवास सुरू आहेत. उपवास सोडण्यासाठी शकिलखान यांचे कुटूंब रात्री साडेतीन वाजता झोपेतून उठले असता त्यांना घरातील कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात आले.
तर घातपात झाला असता
घरात चार जणांचे वास्तव्य असतांना चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली मात्र चोरीच्या प्रसंगी घरातील कुणी सदस्य जागी झाला असता तर त्याचा अज्ञात चोरट्यांनी घातपातदेखील केला असता, अशी चर्चा आहे. शहरात गेल्या अनेक दिवसांपासून घरफोडी झाल्याने रहिवासी धास्तावले आहे. चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक नजीकच्या जिल्ह्यात रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.