10 हजार ग्राहकांना रीडिंग स्लॅब बेनीफिट

0

भुसावळ। येथील पीसी- 2 क्षेत्रातील श्रीनगर, भोईनगर, गणेश कॉलनी, जुना सातारा, अष्टविनायक कॉलनी, हुडको कॉलनी, रेल दुनिया, वरद विनायक कॉलनी, गणेश कॉलनी, मोहितनगर, भिरुड कॉलनी, अयोध्यानगर, विद्यानगर, खळवाडी, शिवकॉलनी परिसर, स्वामी विहार, शालीन पार्क, स्वरुप कॉलनी, वरद विनायक कॉलोनी, महालक्ष्मी नगर, सीताराम नगर, नारायण नगर 1, 2 व 3, गोदावरी नगर, मोरेश्वर नगर आदी भागातील ग्राहकांना 30 दिवसांपेक्षा जास्तचे बील देण्यात आलेले होते. या सर्व भागात विज मीटर रीडिंग 45 दिवसानंतर घेण्यात आलेले होते. रीडिंग उशिराने घेतले गेल्याने एप्रिल मे 2017 चे साधारण पेक्षा 40 टक्के जास्त बिल आले. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी विज वितरणचे कार्यालय गाठून स्लॅब बेनिफीट देण्याची मागणी केली होती. त्यानुसार पीसी 2 भागातील 10 हजार 673 ग्राहकांना नियमानुसार स्लॅब बेनिफिट देण्यात यावे असे आदेश अकाउंट विभागाला देण्यात आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या जागरुकपणामुळे होणारे आर्थिक नुकसान टळले आहे.

लेखा विभागाला मिळाले आदेश
या ग्राहकांना रीडिंग स्लॅबचा बेनीफिट देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. त्यासाठी एक सामूहिक अर्ज वीज कंपनीकडे वीज ग्राहक क्रमांकासह सादर करण्यात आला तसेच पीसी 2 च्या सर्व ग्राहकांना वाढीव बिलाची रक्कम स्लॅब रेट बेनिफिट देवून कमी करावी असे नागरिकांनी विज वितरण कंपनीला मागणी केलेली होती. त्यानुसार 10 एप्रिल रोजीच्या कंपनीच्या कमर्शियल सर्कुलर नंबर 284 नुसार प्रो राटा पध्दतीने पीसी 2 भागातील 10 हजार 673 ग्राहकांना नियमानुसार स्लॅब बेनिफिट देण्यात यावे असे आदेश अकाउंट विभागाला देण्यात आले होते. सध्या बिलात रक्कम वाढीव असली तरी 45 दिवसांच्या बिलाची आहे. त्यात स्लॅब बेनिफिट देवून रक्कम कमी केली गेली आहे. अन्यथा यापेक्षा जास्त बिल आले असते. या पुढेही 30 दिवसांपेक्षा जास्त दिवसांचे रीडिंग घेतले गेले तरी संगणकीय प्रणालीद्वारे स्लैब बेनिफिट देण्यात येईल. असे अतिरिक्त अभियंता व्ही.डी. नवघरे यांनी सांगितले.

यांनी केली होती तक्रार
यासंदर्भात प्रा. धिरज पाटील, रवि वर्मा, संदीप पाटील, सी.एस.पाटील, जयंत चौधरी, विलास भारंबे, गणेश पाटील, चंद्रकांत सरोदे, दर्शन नेहेते व नागरिकांनी विज मीटर रीडिंग वेळेवर घेतले गेले नाही यासाठी 8 मे रोजी तापी नगर येथील विज वितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात तक्रार दाखल केली होती.

भुसावळ येथील पीसी- 2 क्षेत्रातील परिसरातील सुमारे 10 हजार 673 ग्राहकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. पाठपुरावा यशस्वी होण्याचा आनंद आहे. मथुरा अपार्टमेंटजवळ साधारण एक वर्षापूर्वी डीपी टाकली आहे परंतु श्रीनगर भागातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो यासाठी उपाय योजना आखाव्यात अशी चर्चा
झाली आहे.

प्रा.धिरज पाटील