10 हजार घेतांना आयोगाचा अधिकारी चतुर्भूज

0

धुळे। धुळ्याच्या एका शाळेतील मुख्याध्यापिकेकडे 10 हजार रुपयांची लाच मागणार्या राज्य माहिती आयोग खंडपीठाच्या नाशिक कार्यालयातील एका लाचखोर अधिकार्याला लाच घेताना धुळ्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नाशिकमध्ये रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या आहेत. धुळ्याच्या अ‍ॅन्टीकरप्शन ब्युरोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धुळे येथील एका शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिकेने शाळेच्या संदर्भात राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक कार्यालय यांच्याकडे केंद्रीय माहितीचा अधिकार सन 2005 च्या अनुषंगाने दुसरी अपील दाखल केले होते. याप्रकरणाच्या संदर्भात 25 हजार रुपये दंडाची नोटीस न काढण्यासाठी आणि अपील निकाली काढण्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी मुख्याध्यापिकेकडे माहिती आयोगातील प्रभारी कक्ष अधिकारी रवींद्र शामराव सोनार (वय 34) याने केली. तडजोडीअंती 10 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर मुख्याध्यापक असलेल्या या 54 वर्षीय महिलेने धुळ्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

सापळा रचून एसीबीची नाशिकमध्ये कारवाई
तक्रारीची शहनिशा करुन आज सकाळी धुळ्याच्या एसीबीच्या पथकाने नाशिक येथील राज्य माहिती आयोग खंडपीठाच्या कार्यालयाच्या इमारतीत सापळा रचला. लाचखोर रवींद्र शामराव सोनार हा इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जिन्याजवळ तक्रारदार महिलेकडून 10 हजार रुपयांची लाच घेत असताना त्याला रंगेहात पकडण्यात आले.

एसीबीच्या या कारवाईमुळे माहिती आयोग कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले,पोलिस उपाधीक्षक सुनील गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय पवन देसले, पीआय महेश भोरटेकर, पो.ना.कैलास शिरसाठ, देवेंद्र वेंदे, संतोष हिरे, कृष्णकांत वाडीले, प्रकाश सोनार, जितेंद्र परदेशी, किरण साळी, संदीप सरग, कैलास जोहरे, सुधीर सोनवणे, मनोहर ठाकूर, प्रशांत चौधरी, सतीश जावरे, संदीप कदम यांच्या पथकाने ही कारवाई
केली.