नंदुरबार – नंदुरबार येथे होणाऱ्या बौद्ध धम्म परिषदेत दहा हजार जणांना दीक्षा दिली जाणार आहे; अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुनील रामोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी माहिती देताना त्यांनी सांगितले की, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमाने रविवार दि. 26 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता नंदुरबार येथे बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे. नंदुरबार शहरातील नेहरू पुतळ्याजवळ तालुका पोलिस कवायत मैदानावर ही परिषद पार पडेल. परिषदेस दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सुनील रामोशी यांनी अधिक माहिती देताना असेही सांगितले की, नंदुरबार जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने प्रत्येक तालुक्याच्या ग्रामीण भागात कोपरा सभा घेण्यात आल्या. 100 हून अधिक संख्येने झालेल्या या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला व 10 हजार 700 जणांनी बौद्ध धर्म दीक्षा स्वीकारण्यासाठी नोंदणी केली. त्या सर्वांना बौद्ध धर्माचे प्रमाणपत्र बौद्ध महासभेचे कडून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. तथापि प्रत्यक्ष हाती प्रमाणपत्र देऊन दीक्षा देण्याचा समारंभ राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते नंदुरबार येथील परिषदेत पार पडणार आहे. बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्या या दहा हजार लोकांमध्ये हिंदू महार, हिंदू चांभार यासारख्या समाजातून आलेले तसेच पाटील मराठा समाजातील बांधवांचा देखील समावेश आहे; असे सुनील रामोशी यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.