10 हजार 537 कुटुंबांना वैयक्तिक शौचालयांचा लाभ

0

पिंपरी-चिंचवड : शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी (ओडीएफ) शहरातील झोपडपट्टी भागात आतापर्यंत एकूण दहा हजार 537 कुटुंबांना घरगुती वैयक्तिक शौचालयांचा लाभ मिळाला आहे. शहरात एकूण दहा हजार 817 वैयक्तिक शौचालय बांधण्याचे उद्दिष्ट 2 ऑक्टोबर 2017 पूर्वी म्हणजे पावणेदोन महिन्यांत पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कामास गती दिली आहे. ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘स्वच्छ महाराष्ट्र अभियान’ अंतर्गत ही योजना राबविली जात आहेत. घरामध्ये वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी केंद्र शासन 4 हजार, राज्य शासन 8 हजार आणि महापालिका 4 हजार असे एकूण 16 हजार रुपये अनुदान देते. पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात प्रथम 8 हजार रुपये जमा केले जातात.

शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित 8 हजार अदा केले जातात. शहरातील विविध ठिकाणच्या झोपडपट्टी, चाळ आणि नागरी वस्तीतील एकूण 10 हजार 817 कुटुंबांनी वैयक्तिक घरगुती शौचालयांसाठी अर्ज केले आहेत. आतापर्यंत एकूण 6 हजार 892 शौचालये बांधून तयार झाली आहेत, त्याचा वापर केला जात आहे. तर, उर्वरित 3 हजार 645 शौचालयांचे बांधकाम सुरू आहे.