बंगळूरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत सिद्धरामय्या मंत्रिमंडळातील १० मंत्री विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आहेत. तर काही मंत्री थोडय़ाशा फरकाने विजयी झाले आहे. सिद्धरामय्या स्वत: चामुंडेश्वरी मतदारसंघात ३६ हजार मताच्या फरकाने पराभूत झाले. जनता दलाच्या जी.टी. देवेगौडा यांनी या मतदारसंघात विजय मिळविला. सिद्धरामय्या यांनी बदामी मतदारसंघात विजय मिळविला. बंतवाल मतदारसंघात रामनाथ राय (८१,८३१ मते) यांना भाजपच्या यू. राजेश नाईक (९७,८०२ मते) यांनी पराभूत केले.
यांना पत्करावा लागला पराभव
खाण आणि भूगर्भमंत्री विनय कुलकर्णी (६४,७८३ मते) धारवाड मतदारसंघातून पराभूत झाले. भाजपच्या अमृत देसाई (८५,१२३ मते) यांनी त्यांना पराभूत केले. गदग मतदारसंघातून के.एच. पाटील पिछाडीवर होते. मात्र, अखेर त्यांनी केवळ दोन हजार मतफरकाने निसटता विजय मिळविला. तर हल्याळ मतदारसंघात आर.व्ही. देशपांडे यांनीही पिछाडीवरून निसटता विजय मिळविला. सामाजिक विकासमंत्री एच. अंजनेया (६९,०३६ मते) होल्केरी मतदारसंघात पराभूत झाले. महिला विकास आणि बालकल्याणमंत्री उमाश्री (६६,३२४ मते) यांना तेरडल मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला.
मोठ्या फरकाने पराभव
सार्वजनिक बांधकाममंत्री एच.सी. महादेवप्पा, साखरमंत्री मोहन कुमारी, डॉ. प्रकाश पाटील (सेदाम), एस.एस. मल्लिकार्जुन (दावनगेरे), कागोडू थिमाप्पा (सागरा), बसवराज रायरेड्डी (येलबुर्गा) या मंत्र्यांनाही पराभव पत्करावा लागला. स्वतंत्र लिंगायत धर्माची मागणी करणाऱ्या चारपैकी तीन मंत्री पराभूत झाले असून केवळ एम.बी पाटील यांना विजय मिळविता आला आहे. पाटील यांनी बाबळेश्वर मतदारसंघातून ९८ हजार ३३९ मतांसह विजय मिळविल. महिला विकास आणि बालकल्याणमंत्री उमाश्री यांनाही मोठय़ा फरकाने पराभव पत्करावा लागला.
परिवर्तन यात्रेद्वारे सरकारविरोधातधर्मनिरपेक्ष जनता दलाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सातपैकी तीन उमेदवार पुन्हाविजयी झाले आहे. २४ मार्च रोजी राज्यसभा निवडणुकीत मते फुटल्यानंतर या आमदारांनी जनता दलाचा राजीनामा दिला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस.येडियुरप्पा शिकारीपुरा मतदारसंघातून ३५ हजारांवर मतांनी विजयी झाले. राज्यातील सर्व २२४ मतदारसंघात त्यांनी नोव्हेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या काळात येडियुरप्पांनी ७५ दिवस परिवर्तन यात्रेद्वारे सरकारविरोधात वातावरणनिर्मिती केली होती.
विरोधी पक्षनेते व भाजप नेते जगदीश शेट्टर हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून सहाव्यांदा विजयी झाले. येडियुरप्पांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेले शेट्टर हे माजी मुख्यमंत्री असून, जवळपास २२ हजारांच्या मतधिक्याने त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत आपली जागा राखली. यावेळी त्यांना निवडणूक जड जाईल अशी अटकळ बांधली जात होती पण ती फोल ठरली.