अबब…१० हजार बोगस मतदान ओळखपत्र

0

बंगळूरू- कर्नाटक विधानसभा निवडणुकी चार दिवस शिल्लक राहिले असतांना बेंगळुरूत एका अपार्टमेंटमध्ये सुमारे १० हजार मतदान ओळखपत्र आढळून आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली. निवडणूक आयोगाने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

भाजप कॉंग्रेसमध्ये जुंपली

भाजपाने याप्रकरणी एका काँग्रेस नेत्यावर आरोप केले आहेत. हे अपार्टमेंट एका काँग्रेस नेत्याचे असल्याचे भाजपाने म्हटले आहे. राजा राजेश्वरी नगर मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याची मागणी भाजपाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

चौकशी होणार

काँग्रेसने भाजपाच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले असून भाजपाचे हे नाटक असल्याचे म्हटले आहे. भाजपाने बनावट पुरावे गोळा केल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. कर्नाटकचे मुख्य निवडणूक आयुक्त संजीव कुमार यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद आयोजित केली होती. ते म्हणाले की, ९७४६ मतदान ओळखपत्रे आढळून आले आहेत. ही ओळखपत्रे तंतोतंत खरी असल्यासारखी वाटतात. ती एका छोट्या पॅकेटमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यावर पत्ता आणि नावांची नोंद आहे. याप्रकरणी योग्यवेळी योग्य ती कारवाई केली जाईल असा विश्वास देत या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकशाहीवर हल्ला- गौडा

केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी याप्रकरणी ट्विट केले असून हा लोकशाहीवर हल्ला असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी ट्रकमध्ये ठेवण्यात आलेल्या बोगस ओळखपत्रांचे फोटोही पोस्ट केला आहे. राजा राजेश्वरी नगर बेंगळुरूतील मोठा मतदारसंघापैकी एक असून येथे सुमारे ४.७१ लाख मतदार आहेत. वर्ष २०१३ मध्ये या मतदारसंघातून काँग्रेसचे मुनीरत्ना नायडू निवडून आले होते. त्यांना ३७ टक्के मते मिळाली होती.

फेर निवडणूकीची मागणी 

मुनीरत्ना नायडू यांनी पुन्हा निवडणुकीची मागणी केली आहे. २० हजारहून अधिक मतदान ओळखपत्र, पाच लॅपटॉप, एक प्रिंटर आणि नामांकनासाठी नवीन मतदारांकडून वापरले जाणारे निवडणूक आयोगाचे हजारो अर्ज शोधण्यात आले होते, गौडा यांनी म्हटले. पराभवापूर्वीचे काँग्रेसचे हे षडयंत्र असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी केला आहे. तर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथील निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे.

 

भाजपचा समावेश

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही भाजपालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या संपूर्ण प्रकारात भाजपाच्या लोकांचा समावेश असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपा निवडणुकीत पराभूत होत आहे. त्यासाठीच त्यांनी ही नाटक केले आहे. ज्या घरात हे बोगस ओळखपत्र सापडले त्याची मालकीण कोण आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान मंजुला अंजामरी या घराच्या मालकीण असून पूर्वी त्या भाजपामध्ये होत्या. आता त्या काँग्रेसमध्ये सक्रीय असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काँग्रेसचीच पंचाईत झाली आहे.