फुले मार्केटमधील घटना ; महिलेच्या सतर्कतेमुळे सात ग्रॅमची मंगलपोत वाचली ; शहर पोलिसांच्या केले स्वाधीन
जळगाव- शहरातील फुले मार्केटमध्ये नातेवाईकांसोबत खरेदी करत असतांना बीडच्या महिलेच्या गळ्यातील सात ग्रॅमची सोन्याची मंगलपोत अंत्यत चलाखीने तोडून लांबवून पळण्याच्या प्रयत्नातील अल्पवयीन मुलीला रंगेहाथ पकडल्याची घटना सोमवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास घडली. सतर्क महिलेला वेळीच प्रकार लक्षात आल्याने नुकसान टळले. आई वडीलांच्या शोधार्थ मुलीने महिलांना चांगलेच भटकाविले अखेर मिळून न आल्याने महिलेसह तिच्या नातेवाईकांनी मुलीला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
रामेश्वर कॉलनी येथील प्रमिला गणेश कदम यांच्याकडे त्याच्या बीड येथील नणंद व नातेवाईक आले आहे. हे नातेवाईक मंगळवारी रात्री बीडकडे रवाना होणार आहेत. त्यापूर्वी सोमवारी प्रमिला कदम यांच्यासह त्यांच्या बीड येथील नातेवाईक महिला, मुले खरेदी करण्यासाठी दुपारी 3 वाजता फुले मार्केटमध्ये आल्या. याठिकाणी काही खरेदीही केली. मार्केटमध्ये फिरत असतांना गुप्ता शेवच्या दुकानाजवळ वळणावर त्या पर्स असलेल्या गाडीवर थांबल्या.
एक हाती लागली, तीन मुली पसार
मार्केटमध्ये वळणावर पर्स लोटगाडीवर कदम यांची नणंद पर्स बघत होती, यादरम्यान त्याच्या मागे तीन ते चार अल्वयीन मुली होत्या. यावेळी एका 10 वर्षाच्या मुलीने उभ्या महिलेल्या हाताखालून हात घालत, अत्यंत चलीखीने गळ्यातील मंगलपोत तोडली, गळ्यातील पोत तुटताच महिलेने पोत ओढणार्या मुलींचा हात पकडला. यानंतर सोबत असलेल्या कदम यांच्यासह एक महिला व मुलांनाही प्रकार कळल्याने त्यांनीही पळण्याच्या प्रयत्नातील मुलीला पकडले. व तिला शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. या मुलीसोबत आणखी तीन मुली होत्या. मात्र तिला पकडल्याचे लक्षात येताच, त्या पळून गेल्याचेही कदम यांनी शहर पोलिसांना माहिती देतांना सांगितले.
आई, वडीलांसह अकोल्याहून आली शहरात
महिलेसह तिच्या नातेवाईकांनी मुलीला तिच्या आई, वडील तु कुठली अशी विचारणा केली, असता मुलीने रडत रडत आम्ही अकोला येथील असून फुगे विकण्यासाठी सकाळीच शहरात आल्याचे सांगितले. आई, वडील उद्यानात असल्याचे सांगत, महिलांना शामा प्रसाद मुखर्जी उद्यानात घेवून गेली. याठिकाणी मात्र कोणीही नव्हते. खोटे बोलत असल्याची खात्री झाल्यावर महिलांनी तिला पुन्हा शहर पोलीस ठाण्यात आणले. दरम्यान मुलगी मला सोडून द्या, मी पोत तोडली नाही, अशी गयावया करत होती. अल्पवयीन असल्याने प्रमिला कदम यांनी तक्रार देणे टाळले. सात ग्रॅमची 20 ते 25 हजाराची पोत सुखरुप मिळाल्याने कदम यांच्यासह महिलांनी घरचा रस्ता धरला. याप्रकरणी शहर पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलांचा चोर्यांसाठी वापर
शहरातील फुले मार्केटमध्ये पाकिट, मंगलपोत, मोबाईल तसेच मोबाईल लांबविण्याच्या घटनांमध्ये लहान मुलांचा वापर केला जात असल्याचा नवीन फंडा समोर आला आहे. गर्दीचा फायदा घेवून लहान मुले सहज चोरी करुन शकतात, चोरीनंतर सहज पसार होवू शकतात. तसेच जर चोरी करतांना सापडलेही तर अल्पवयीन असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही, त्यांना सुधारगृहात पाठविले जाते. त्यामुळे अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दरम्यान नागरिकांनी गर्दीचा ठिकाणी दागिणे, रोखड असलेली पर्स, दागिण्यांबाबत खबरदारी पाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.