100 कोटींच्या कामांमुळे शिंदखेडा शहराची शोभा वाढणार

0

दोंडाईचा। शिंदखेडा शहर हे तालुक्याचे शहर असतांना याठिकाणी पूर्वी ब्रिटीशकालीन तहसील कार्यालयाची पडकी इमारत होती, नगरपंचायत ऐवजी ग्रामपंचायत होती, रस्त्यावर धुळीचे साम्राज्य होते, पाणीप्रश्न तर गेल्या 30 वर्षापासून भेडसावत होता, आदिवासी आणि दलित विदयार्थ्यांना भाडयाच्या इमारतीत वसतीगृह होते, पंचायत समितीची इमारत देखील तालुक्याला साजेल अशी नव्हती, रेल्वे गेटवर अनेकदा प्रतिक्षा करावी लागत होती, अशा नानाविध समस्यांनी त्रस्त शिंदखेडा शहराचा गेल्या 7 ते 8 वर्षात मोठे बदल घडले आहेत, त्यासाठी राज्याचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी शिंदखेडा शहराचे रूप पालटवून टाकले आहे. जवळपास 100 कोटींची विकास कामे मंजूर करून आणली त्यातील बरीच कामे पूर्ण देखील झाली तर काही कामे प्रगतीपथावर आहेत.

ना.जयकुमार रावल यांच्या संघर्षातून उभी राहीलेली मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीचा कामाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून त्यानिमीत्त शिंदखेडा नगरी सजली आहे. इतर तालुक्यांपेक्षा दुप्पटचा म्हणजे 5 कोटी 40 लाखाचा निधी शिंदखेडा शहराच्या प्रशासकिय इमारतीसाठी मंजूर आणले त्यातून धुळे आणि नंदूरबार जिल्हयातील सर्वात प्रशस्त अशी भव्य दिव्य इमारत उभी राहीली आहे, याशिवाय पोलिस स्टेशनला देखील स्वतंत्र 60 लक्ष रूपयाची इमारत मंजूर करून स्वतंत्र पोलिस स्टेशन आज दिमाखात उभे आहे. ग्रामपंचायतीला पाहिजे तेवढा निधी मिळत नसल्यामुळे शिंदखेडा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर करण्यासाठी जो संघर्ष ना.जयकुमार रावल यांनी सन 2009 ते 2012 पर्यंत केला तो नक्कीच वाखाणण्याजोगा होता.

उड़डाणपुलाला देखील मंजूरी
रेल्वे गेटमुळे नागरीकांना अनेकदा थांबावे लागत होते म्हणून रेल्वे उड़डाणपुलाला देखील मंजूरी मिळवून आणली असून शहरात आगीमुळे नुकसान टाळण्यासाठी नविन अग्निशमन बंब देखील मंजूर करून आणला आहे, आदिवासी आणि दलित विदयार्थ्यांना हक्काचे वसतीगृह व्हावे म्हणून जवळपास 8 कोटीच्या निधीतून फाईव्ह स्टार हॉटेल सारखे वसतीगृह शिंदखेडयाची शोभा वाढवित आहेत. एवढेच नव्हे तर आपल्या आमदार निधीतून देखील शहरात कितीतरी कामे करून आपली छाप पर्यटन व रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनी पाडली आहे.

बुराई नदीवर पुल
पंचायत समितीच्या इमारतीचे देखील डिझाईन झाले असून त्याला नुकतीच तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात आली आहे. शिंदखेडा शहराचा सर्वात प्रमुख प्रश्न म्हणजे पाणीटंचाईचा होता, दरवेळी 8 महिने भीषण पाणीटंचाईचा सामना शिंदखेडेकरांना करावा लागत असे, पंरतू सुरवातीला तात्पुत्या योजनेसाठी 61 लक्ष नंतर कायमस्वरूपी योजनेसाठी 21 कोटीचा भरीव निधी मंजूर करून दिला आहे, एवढेच नव्हे तर माळीवाडा सह गावभागातील नागरीकांना धुळयाकडे किंवा शिरपूरकडे जाण्यासाठी गावाला वळसा घालून 2 ते 3 कि.मी.चा फेरा करून जावे लागत होते म्हणून माळीवाडयाजवळ बुराई नदीवर स्वतंत्र पुलाच्या कामासाठी 5 कोटीचा भरीव निधी मंजूर करून दिला आहे.