100 कोटींच्या मालमत्तेवर पाणी सोडून मध्यप्रदेशातील जैन जोडपे बनणार संत!

0

नीमच | येथील प्रतिष्ठित उद्योगपती सुमित राठोड हे पत्नी अनामिकासह जैन धर्माची शिक्षा घेऊन संत बनायला निघाले आहेत. हे जोडपे 100 कोटींच्या मालमत्तेवर तर पाणी सोडेलच, शिवाय तीन वर्षांच्या लेकीचाही त्याग करेल. संपत्तीसह सर्व राजेशाही थाट अनेकांनी सोडले आहेत; पण त्यासोबत आपल्या प्रिय मुलीला सोडून भिक्षू जीवनाचा आरंभ करण्याची ही देशातील पहिलीच घटना ठरेल. जैन आचार्य रामलाल महाराज 23 सप्टेंबर रोजी सुरत येथे राठोड दांपत्यास दीक्षा देतील.

अनामिका आणि सुमित हे दोघेही चार वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाले होते. तीन वर्षांची लेक इभ्यासह लहान वयातच सांसारिक पाश सोडून नव्याने धर्मासाठी समर्पित साधे जीवन जगण्याचा निर्णय या जोडप्याचा निर्णय नीमच शहरच नव्हे तर देशभर जैन समुदायात चर्चेचा विषय ठरला आहे. कुटुंबातील सदस्यांसह समाजातील अनेक मान्यवरांनी दोघांना समजावून सांगितले; पण दोघेही आपल्या गृहस्थजीवन त्यागण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. गुरुवारी ते कुटुंब व नीमच शहराचा निरोप घेऊन नव्या जीवनाचे व्रत स्वीकारण्यासाठी सुरतला रवाना झाले.

काय आहे पार्श्वभूमी ?
सुमित राठोड यांनी लंडनहून आयात-निर्यातीतील डिप्लोमा केला आहे. लंडनमध्ये दोन वर्षं काम केल्यानंतर, ते नीमच शहरात परत आले आणि आपला व्यवसाय सांभाळला. सुमित यांच्या सुमारे 10 कोटींच्या कारखान्यात, 100 लोक काम करतात. त्यांचा जमीन व्यवसायही मोठा आहे. त्यांची पत्नी अनामिका लहानपणापासून खूप हुशार विद्यार्थी होती. 8 वी, 10 वी आणि 12 वीच्या परिक्षेत राजस्थान बोर्डात टॉप केल्यानंतर त्यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली. हिंदुस्तान झिंकमध्ये 8 ते 10 लाख वार्षिक पॅकेजवर नोकरी सुरू केली. 2012 मध्ये लग्न झाल्यानंतर अनामिका यांनी नोकरी सोडली. आता त्या पती सुमीतसोबतच दीक्षा घ्यायला निघाल्या आहेत. दोघांच्या या निर्णयावर तीन वर्षांची लेक इश्यामुळे अनेक प्रश्न उठविले जात आहेत, कारण ती निष्पाप लेक आई-वडिलांचे छत्र गमावून बसेल. मात्र, सुमित-अनामिका म्हणतात, की जी मुले आई-बाप गमावतात त्यांचेही कुटुंबात पालन-पोषण होतेच ना ..!