1000 कोटींची मिलीभगत

0

पुणे । सुरुवातीपासून प्रत्येक टप्प्यावर वादात असलेल्या सामान पाणी पुरवठा योजनेत जवळपास 1000 कोटी रुपयांची मिलीभगत झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर केला आहे. इतकेच नव्हे तर या योजनेत कन्सलटंन्ट, निविदा भरणार्‍या कंपन्या आणि सत्ताधारी यांची रिंग झाली असल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी माजी सभागृह नेते सुभाष जगताप उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसने काही आकडेवारी सादर करून योजनेच्या निविदेतील तफावत मांडण्याचा प्रयत्न यावेळी केला. या प्रकरणाची पंतप्रधानांकडे तक्रार करण्यात आली आहे. पंतप्रधान या भाजपच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार का असा सवालही विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थित केला आहे.

वडगाव क्रेंद्रासाठी 544 कोटी
500 एमएलडी इतकी क्षमता असणार्‍या पर्वती जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी प्रशासनाने 425 कोटी 77 लाखांचा अंदाज बांधला होता. या निविदेसाठी 26 टक्के वाढीव दराने आलेली 540 कोटी रुपयांची निविदा संमत करण्यात आली. 350 एमएलडी इतकी क्षमता असणार्‍या कॅन्टोन्मेन्ट जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी 371 कोटी 26 लाखाच्या निविदेचा अंदाज बांधण्यात आला होता. यासाठी 26.79 टक्के इतक्या वाढीव दराने 469 कोटी 94 लाख रुपयांची निविदा मान्य करण्यात आली. 250 एमएलडी इतकी क्षमता असणार्‍या वडगाव जलशुद्धीकरण केंद्रासाठी 430 कोटी 47 लाख रुपये इतका अंदाज असताना 26.58 टक्के अधिक दराने 544 कोटी 88 लाख निविदेस संमती दिली गेली.

वडगावसाठी एवढा खर्च कसा?
200 एमएलडी इतकी क्षमता असणार्‍या वारजे जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी 490 कोटी 64 लाख एवढा खर्च होण्याचा अंदाज प्रशासनाने मांडला असताना 617 कोटी 78 लाख रुपयांची निविदा मान्य करण्यात आली आहे. मात्र, पर्वतीसाठी 500 एमएलडी पाण्यासाठी 540 कोटी खर्च येणार असेल तर वडगावच्या 250 एमएलडी पाण्यासाठी त्याच्या निम्मा खर्च येण्याऐवजी 544 कोटी एवढा कसा येऊ शकतो, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.

कंपन्या आणि सल्लागारांमध्ये साटेलोटे
साधारणपणे 100 कोटींना एक एमएलडी असा अंदाज धरला तर वारजे प्रकल्पाला 200 एमएलडी असताना 490 कोटींची निविदा काढण्यात आल्याकडे लक्ष वेधले. या प्रकल्पाला 200 कोटींचीच निविदा काढणे अपेक्षित असल्याचे तुपे म्हणाले. या सर्व प्रकरणामध्ये एसजीआय इटालियन सल्लागार कंपन्या आणि सत्ताधार्‍यांमध्ये रिंग झाली असल्याचे ते म्हणाले. जलवाहिनीच्या कामांच्या निविदांमध्ये तब्बल 25 ते 26 टक्क्यांची रिंग झाली तरी सत्ताधारी त्यावर काहीच बोलत नसल्याचा उल्लेख त्यांनी केला. या योजनेत सत्ताधारी, प्रशासनातील काही निवडक अधिकारी, निविदा भरणार्‍या कंपन्या आणि सल्लागार संस्था यांचे साटेलोटे झाल्याचा उच्चार त्यांनी केला.

योजनेला नाही भ्रष्टाचाराला विरोध
समान पाणीपुरवठा योजना ही राष्ट्रवादीने आणली असे यावेळी तुपे म्हणाले. आमचा योजनेला विरोध नाही. मात्र, भाजपच्या भ्रष्टाचाराला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमच्या सत्ताकाळात या योजनेला मंजुरी देण्यात आली. पण योजनेच्या निविदा, त्यासाठी कर्जरोख्यांची उभारणी हे सर्व भाजपच्या सत्ताकाळात झाल्याचे त्यांनी सांगितले.