चाळीसगाव। रुग्णांसाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी शासनाने 108 क्रमांकाची रुग्णवाहिका सुरु केलेली आहे. 108 या क्रमांकावर संपर्क साधल्यास काही मिनीटात ही रुग्णवाहिका मागणीच्या स्थळी रुग्णांच्या सेवेसाठी पोहोचते. रुग्णांवरील अतिप्रसंगाच्या समयी अतिशय महत्वाची भुमिका बजावणार्या रुग्णवाहिकेचा गैरवापर होतांना दिसत आहे. प्रत्येक शासकीय रुग्णालयाला ही रुग्णवाहिका देण्यात आलेली आहे. मात्र अनेक ठिकाणी खाजगी कामासाठी वापर होतांना दिसत असल्याची तक्रार आहे. दरम्यान चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाला देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचा खाजगी वापर होत असल्याची तक्रार लोकसंघर्ष मोर्चातर्फे करण्यात आली असून चौकशी करण्याची मागणी केली आहे. रुग्णवाहीकेचा खाजगी वापर होत असल्याची तक्रार लोकसंघर्ष मोर्चाचे प्रसिद्धी प्रमुख सोमनाथ माळी यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यासह वरिष्ठांना निवेदनाद्वारे केली असुन चौकशीची मागणी केली आहे.
वाहन चालकाबाबत तक्रार
रुग्णांना तातडीच्या सेवा मिळावी यासाठी रुग्णवाहिका देण्यात आलेल्या आहेत. एमएच 14 सीएल 0811 या रुग्णवाहिकेवरील वाहन चालक ललीत अशोक पाटील हे व्यवस्थीत रुग्णसेवा देत नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 21 ललीत पाटील यांने ब्राम्हणशेवगे या गावी घेऊन गावातील नागरिकांना या गाडीच्या माध्यमातून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रुग्णवाहीकेत रुग्ण नसतानाही जोरात चालवत असतो अशी तक्रार करण्यात आली आहे.
मागील वर्षी झाला अपघात
मागील वर्षी भरधाव वेगात रुग्णवाहिका चालवत असतांना पाटचारीत पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली होती. चालकामुळे अपघात होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे.