पाचोर्‍यात शिकार्‍यांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात

0

नीलगायीची शिकार उघड ; शस्त्रांसह सात आरोपी ताब्यात

भुसावळ- वनप्राण्यांची शिकार करून शिकारी चारचाकी वाहनातून पसार होत असल्याची गुप्त माहिती पाचोरा पोलिसांना मिळाल्यानंतर लावलेल्या सापळ्यात वरखेडी नाक्यावर सात शिकारी अडकले. रविवारी रात्री उशिरा पाचोरा पोलिसांनी केलेल्या कारवाईत मालेगावातील सात शिकार्‍यांसह 95 किलो वजनाचे नील गायीचे मांस तसेच वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लागणारी बंदूक, पाच वापरलेली तर 16 जिवंत काडतुसे व धारदार शस्त्र जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक केशव पातोंड यांच्या मार्गदर्शाखाली पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्यामकांत सोमवंशी, एपीआय सचिन सानप, उपनिरीक्षक पंकज शिंदे व डीबी कर्मचार्‍यांनी यशस्वी केली. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपींनी रविवारी रात्री जामनेर परीसरातील जंगलात नीलगायीची शिकार केली. या प्रकरणी आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्या तसेच आर्म अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून वनविभागाच्या ताब्यात आरोपींना देण्यात येणार आहे. आरोपींच्या अटकेनंतर अनेक बाबींचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निरीक्षक सोमवंशी व त्यांच्या टीमचे धडाकेबाज कारवाईमुळे कौतुक होत आहे.