साकरी ग्रामपंचायत कार्यालयात सदस्याने ग्रामसेवकाच्या खुर्चीवर बसून साधला नागरीकांशी संवाद
भुसावळ- निभोंरा बु.॥ गावात गत वर्षापासून कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरीकांच्या घरातील विजेवरील उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने त्रस्त नागरीकांनी वारंवार वीज वितरण कंपनीकडे तक्रार केली मात्र तक्रारींची दखल घेतली न गेल्याने त्रस्त नागरीकांनी भुसावळातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर सोमवारी दुपारी धडक देत वीजपुररवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
कमी दाबामुळे उपकरणे जळाल्याने ग्रामस्थ संतप्त
तालुक्यातील साकरी शिवारातील निंभोरा बुद्रुक परीसरातील नागरीकांच्या घरातील वीजपुरवठा मागील वर्षापासून कमी दाबाने होत आहे. परीणामी नागरीकांच्या घरातील फ्रिज, पंखे आदी विजेवरील उपकरणाचे नुकसान होत आहे. याबाबत या भागातील नागरीकांनी फेकरी येथील कार्यालयामध्ये तक्रार करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली मात्र या कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने व उन्हाळयाच्या दिवसात अधिकच कमी दाबाने वीजपुरवठा होण्याचे प्रमाण वाढल्याने त्रस्त झालेल्या महिला व पुरूषांनी फेकरी येथील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले मात्र या ठिकाणी त्यांच्या तक्रारींची दखल घेतली न गेल्याने संतप्त झालेल्या महिला व पुरूषांनी थेट भुसावळातील वीज वितरण कंपनीचे कार्यालय गाठले. या ठिकाणी त्यांनी उपकार्यकारी अभियंता अजय पाटील यांच्याकडे आपल्या समस्यांचा पाढा वाचून निपटारा करण्याची मागणी केली. यावेळी त्रस्त नागरीकांच्या समस्यांचा निपटारा करण्याचे पाटील यांनी आश्वासन दिले तसेच वीज तारा जोडण्यासाठी 50 हजार रूपयांची रक्कम भरण्याची सुचना दिली मात्र नागरीकांनी आम्ही साकरी ग्रामपंचायतीचा लागू असलेल्या सर्व करांचा रकमेचा भरणाा करीत असल्याने उप कार्यकारी अभियंता यांच्या मागणीस नकार दिला. यामुळे त्रस्त झालेल्या महीला व पुरूषांनी थेट साकरी ग्रामपंचायतीचे कार्यालय गाठले.
शाखा अभियंता यांनी घेतला काढता पाय
साकरी शिवारातील निंभोरा बुद्रुक येथील त्रस्त झालेल्या नागरीकांनी विजेच्या संदर्भात आपल्या समस्यांचा निपटारा करण्यासाठी फेकरी येथील कार्यालय गाठले मात्र कार्यालयातील शाखा अभियंता नागरीकांच्या समस्यांचे निवारण न करताच कार्यालयातून निघाले त्यामुळे संतापलेल्या महिला व पुरूषांनी भुसावळातील कार्यालय गाठले.
साकरी ग्रामपंचायतीकडे मागणी
साकरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणार्या या वसाहतीमध्ये अनेक सांडपाण्याची गटारी, रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची समस्याही निर्माण झाली आहे. या समस्यांच्या निपटार्यासाठी महिला व पुरूषांनी साकरी ग्रामपंचायत कार्यालय गाठले. यावेळी सरपंच कांचन भोळे आणि सदस्य सोपान भारंबे यांनी शासनाकडून येणार्या निधीतून या वसाहतीमधील समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
प्रस्ताव जिल्हा परीषदेकडे
या वसाहतीमध्ये नागरीकांनी स्व-खर्चाने पोल उभे केले आहेत. या पोलवर ग्रामपंचायतीने केबल टाकुन सार्वजनिक पथदिवे लावण्यात आले आहेत. यामुळे वीज तारांअभावी वीजपुरवठा कमी दाबाने होतो. परीणामी, नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार सरपंचाकडे करण्यात आली. यावेळी नवीन वीज वाहक तारा टाकण्यासाठी जिल्हा परीषदेकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
सदस्य ग्रामसेवकाच्या खुर्चीवर
निंभोरा बुद्रुक येथील नागरीक साकरी ग्रामपंचायतीमध्ये गेले असता ग्रामपंचायत सदस्य सोपान भारंबे यांनी ग्रामसेवक अशोक खैरनार यांच्या शासकीय खुर्चीवर बसून नागरीकांशी संवाद साधला. यामूळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्यांना ग्रामसेवकांच्या खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.
यांची होती उपस्थिती
आपल्या विविध समस्यांचा निपटारा होण्यासाठी डी.के.झासकर, पी.यु.पाटील, पी.एप्प.धनोकार, प्रमोद तायडे, भैय्या सोनवणे, दीपक अहिरे, किरण पाटील, शांताराम तायडे यांच्यासह या भागातील किमान 50 ते 60 महिला पुरूष उपस्थित होते.