मुंबई: दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाच्या तारखा अजून जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे सोशल मीडियावरुन फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांनी केले आहे. दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख, लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर, माध्यमांमध्ये जाहीर करु, असंही बोर्डाने स्पष्ट केले.
विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १७ लाख ५१ हजार ३५३ विद्यार्थी बसले आहेत. तर बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातील नऊ विभागीय मंडळातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी बसले आहेत. सध्या व्हॉट्सअप, फेसबुकवर दहावी-बारावी निकालाच्या वेगवेगळ्या तारखांचे मेसेज फिरत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च-एप्रिल महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे बारावीचा निकाल मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात येणं अपेक्षित असतं. तर दहावीचाही निकाल जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याचा अंदाज आहे. मात्र अद्याप तारखाच जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.