11 गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा

0

गोमाईवर बॅरेज बांधून सिंचनाची सोय द्या
शहादा :
तालुक्याच्या उत्तर भागात गोमाई नदीवर मिनी बॅरेज बांधून सिंचनाची सोय उपलब्ध करून द्यावी, अन्यथा लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करणार नाही, असा पवित्रा 11 गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे. 11 ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी, सदस्यांसह ग्रामस्थांनी तहसीलदार मनोज खैरनार यांना दिलेल्या निवेदनातून करत कारवाईची मागणीही केली आहे.

शहादा तालुक्यातील दामळदा, गोगापूर, टुकी, भागापूर, वडवी, तिधारे, कुरंगी, भोरटेक, ओझट, चिखली आणि जाम या गावांमध्ये गेल्या काही वर्षात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्यासोबतच शेतीसाठीही पाणी मिळत नसल्याने समस्या निर्माण होत आहेत. अशा पाश्वभूमीवर याभागात गोमाई आणि उंबरी नदीवर मिनी बॅरेज अर्थात चेक डॅम बांधण्याची 20 वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी या गावांनी सातत्याने पाठपुरावाही केला आहे. परंतु कारवाई अद्यापही झालेली नाही. त्यातून मार्ग निघत नसल्याने या गावांनी एकत्र येत ठराव करत लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याची तयारी दर्शविली आहे.

3 हजार हेक्टर जमीन येणार ओलिताखाली दामळदा परिसरातून वाहणार्‍या गोमाई नदीवर मिनी बॅरेजची उभारणी झाल्यास साधारण 3 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यातून शेती आणि पिण्याचे पाणी असा दुहेरी प्रश्न मार्गी लागून गोमाई नदीची सुरु असलेली हानी कमी होऊन काठावरील गावे आणि शेती यांना संजीवनी मिळणार आहे. परंतु बॅरेजबाबत कारवाईच न झाल्याने मतदानावर बहिष्काराचा निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आला आहे. यावर ते ठाम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवेदनावर दामळदा सरपंच हरिराम मालचे, उपसरपंच डॉ. विजय चौधरी, गणपत ठाकरे, भरत पाटील, रंजना पाटील, द्वारकाबाई मालचे, ओझर्दा सरपंच गणेश वळवी, उपसरपंच भरत पवार, जाम गावचे सरपंच ईश्वर वाघ, उपसरपंच सुनील पवार, भोरटेक सरपंच गीताबाई पवार, उपसरपंच सुनील पवार, ईश्वर वसावे, महेंद्र शेमळे, प्रदीप बोरसे, गोगापूरच्या सरपंच यमुनाबाई सोनवणे, टुकीच्या सरपंच संगीताबाई पवार, भागापूरचे सरपंच रमेश पवार, उपसरपंच नीलेश पाटील यांच्या 11 गावातील ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.