11 गावांना पालिकेच्या दराने मिळकत कर

0

पुणे । महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 11 गावांना पुढील आर्थिक वर्षापासून (1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019) महापालिकेच्या दराने मिळकतकर आकारला जाणार आहे. त्यासाठी आवश्यकता असलेल्या मिळकत नोंदणीची तपासणी पालिका प्रशासनाने सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, या गावांमधील नागरिकांना पहिल्याच वर्षी 100 टक्के कर आकारणी केली जाणार नाही. तर पुढील पाच वर्षे दरवर्षी 20 टक्के दराने ही कर आकारणी केली जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव महापालिकेच्या मिळकतकर विभागाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

राज्यशासनाने मागील महिन्यात हद्दीजवळील 11 गावांचा समावेश महापालिकेत केला आहे. पुण्याच्या उपनगरांच्या जवळ असलेल्या या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकरण झाले असल्याने या गावांच्या सुमारे 133 चौरस किलोमीटर हद्दीतील जवळपास 80 टक्के क्षेत्रावर बांधकामे झालेली आहेत. मात्र, त्या तुलनेत या गावांधील कर आकारणी झालेली नाही. आता ही गावे पालिकेत आलेली आहेत. त्यामुळे या गावांमधील बांधकामांच्या नोंदी तसेच कर आकारणीची कागदपत्रे प्रशासनाकडून ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर या गावांना पुढील आर्थिक वर्षापासून पालिकेच्या दराने कर आकारणी सुरू होणार आहे. मात्र, त्यासाठी स्थायी समिती आणि मुख्यसभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवला आहे.