11 दंगलखोरांना अटक!

0

पुणे/शिक्रापूर : कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आल्याची माहीती शिक्रापूर पोलीसांनी दिली आहे. कोरेगाव-भीमा, सणसवाडी, कोंढापुरी परिसरातून त्यांना अटक केली असून यापैकी 3 जण अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले. आरोपींच्या अटकेमुळे तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलीसांनी सर्व आरोपींच्या नावाबाबत गुप्तता बाळगली आहे. आरोपींची नावे गुप्त ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने वढू बुद्रुक येथे पोलिस अधिकार्‍यांची गाडी फोडल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना दहा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तसेच कोरेगाव भिमा दंगलप्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींना 12 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे तसेच तीन अल्पवयीन आरोपींना जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोपींच्या नावाबाबत गुप्तता
कोरेगाव भीमा येथील जाळपोळ आणि दगडफेकीचा प्रकार तसेच वढू बुद्रुक येथे 29 डिसेंबर रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या गाडीवर दगडफेक केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन्ही गटांचे आरोपी आहेत. त्यांना कोरेगाव भीमा, सणसवाडी व कोंढापुरी येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दंगल माजवणे, जाळपोळ, दगडफेक तसेच सार्वजनिक व शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांवर हल्ला करणे आदी कलमांतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. अप्पर पोलिस अधीकक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी कारवाईस सुरुवात केली आहे. पोलीसांचे एक स्वतंत्र पथक दंगल करणार्‍या आरोपींबाबत माहीती घेत आहे. घटनास्थळावरुन ताब्यात घेतलेले सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींची ओळख पटविण्यात येत आहे.

चौकशीसाठी सांगलीत मोर्चा
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हल्ल्याची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश व सीबीआयतर्फे चौकशी करावी. दलितांवर झालेल्या अमानुष हल्ल्यातील आरोपींना तातडीने अटक करावी, यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात जिल्हाभरातून कार्यकर्ते सहभागी झाले होते. रिपाइंचे प्रदेश कार्याध्यक्ष व माजी महापौर विवेक कांबळे आणि जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ठोकळे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

देशभरात उमटले पडसाद
पुणे-नगर महामार्गावरील भीमा-कोरेगावमध्ये सोमवारी 1 जानेवारीरोजी दोन गट भिडले. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर तरुणांनी रॅली काढली. त्याचवेळी पुण्याकडून कोरेगावच्या दिशेने आंबेडकरी अनुयायी येत होते. त्यांच्यावर दंगलखोरांनी दगडफेक केली. व त्यानंतर जाळपोळीचे प्रकार मोठ्याप्रमाणात घडले होते. सोमवारी भीमा कोरेगावच्या रणसंग्रामाला 200 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विजय दिवस साजरा होत असताना, तिथूनच जवळ असणार्‍या सणसवाडी, शिक्रापूर, कोंढापूरी आदि गावांच्या परिसरात दंगल उसळली होती. दगडफेकीत पोलिसांसह काहीजण जखमी झाले तर एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत.

एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शनिवार वाड्यावर पार पडलेल्या एल्गार परिषदेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कबीर कला मंचचा समावेश करण्यात आला आहे. कबीर कला मंचाने एल्गार परिषदेत सादर केलेल्या गीतांतून लोकांना चेतवल्याचा गुन्हा पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. यापुर्वी या परिषदेत भाषण करणारे गुजरामधील दलित समाजाचे आमदार जिग्नेश मेवाणी आणि जेएनयूचा उमर खालिद यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत. कोरेगाव-भीमाच्या लढ्याला 200 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 31 डिंसेबर रोजी पुण्याच्या शनिवार वाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. पण या कार्यक्रमानंतर 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा जवळच्या सणसवाडी परिसरात हिंसाचार उफाळून आला होता.