11 हजारांची लाच स्वीकारण्याचा ‘उपद्रव’ अंगलट!

0

पिंपरी-चिंचवड : निगडी येथील ‘अ’ प्रभाग कार्यालयातील उपद्रव शोध अधिकार्‍याला 11 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास केली. अजय अशोक सिन्नरकर (वय 51) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकार्‍याचे नाव आहे. दरम्यान, महापालिका आयुक्तांच्या लघुलेखकाला 12 लाख रुपयांची लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा लाचखोरीचे प्रकरण उजेडात आल्याने महापालिकेतील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.

तक्रारदाराला दाखविली दंडाची भीती
या प्रकरणातील तक्रारदारावर अनधिकृत फ्लेक्स लावल्याने दंडात्मक कारवाई झाली होती. फ्लेक्स लावल्याप्रकरणी आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम कमी करण्यासाठी ‘अ‘ प्रभाग कार्यालयातील उपद्रव शोध अधिकारी अजय सिन्नर याने 11 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच न दिल्यास न्यायालयात केस दाखल केल्यानंतर 40 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल, अशीही भीतीही त्याने तक्रारदाराला दाखविली होती.

पाच हजारांची पावती देऊ केली
तक्रारदाराने दंडाची रक्कम कमी करण्याची विनंती केली असता, अजय सिन्नर याने तक्रारदाराकडून 16 हजार रुपयांची मागणी करून 16 हजार रुपयांपैकी पाच हजारांची पावती देणार असल्याचे सांगितले. उर्वरित रक्कम तो लाचेच्या स्वरुपात घेणार होता. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी लाचलुचतप विभागाच्या अधिकार्‍यांनी ‘अ’ प्रभाग कार्यालयात सापळा लावला होता. या सापळ्यात सिन्नर अडकला. तक्रारदाराकडून 11 हजारांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.