11 गावांची आर्थिक घडी विस्कळीत

0

पुणे । राज्यशासनाने महापालिकेत समाविष्ट केलेल्या 11 गावांच्या आर्थिक स्थितीची घडी महापालिका प्रशासनास अजूनही बसविता आलेली नाही. ही गावे महापालिकेत येऊन पाच महिने झाले तरी, अनेक गावांनी जमा-खर्चाबाबत स्वाक्षरीच्या प्रति महापालिकेस सादर केलेल्या नाहीत. तसेच जमा रकमेचा तपशील दिलेला असला, तरी देय रकमांची माहिती महापालिकेस देण्यात आलेली नाही. त्यामुळे या गावांच्या रकमांमध्ये फेरफार होण्याची शक्यता महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

शासकीय अनुदानाबाबत मौन
या संबंधित ग्रामपंचायतींना शासनाकडून विकासकामांसाठी वेगवेगळे अनुदान देण्यात येते. मात्र, मागील आर्थिक वर्षात सप्टेंबर-2017 पर्यंत शासनाने किती अनुदान दिले, किती अनुदान द्यायचे बाकी आहे, ही गावे महापालिकेत आल्याने ते अनुदान महापालिकेस मिळणार का, तसेच या शासनाकडून या अनुदानातील अखर्चित निधी परत घेतला जाणार का, महापालिकेस देणार याची कोणतीही नाही. त्यामुळे महापालिकेने शासनाकडे याबाबत विचारणा केली जात असली, तरी अजून त्याबाबत शासनाकडून काहीच कळविण्यात आले नसल्याचे प्रशासनाने अहवालात स्पष्ट म्हटले आहे.

गावांकडे 10 कोटी शिल्लक
या 11 गावांबाबतीत धक्कादायक बाब म्हणजे, पालिकेने आर्थिक बाबींच्या दप्तरानुसार, या गावांना 1 एप्रिल 2017 पासून सप्टेंबर 2017 अखेरपर्यंत सर्व प्रकारे 56 कोटी 86 लाख, 51 हजार 668 रुपयांचा महसूल मिळालेला आहे. त्यातील तब्बल 46 कोटी 19 लाख 37 हजार 747 रुपयांचा निधी खर्ची पडला आहे. त्यामुळे या गावांकडे अवघे 10 कोटी 67 लाख 13 हजार 920 रुपये शिल्लक असून ही रक्कम तसेच गावांची बँक खाती अजूनही पालिकेच्या ताब्यात आली नसल्याचा खुलासा या अहवालात करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने या गावांच्या मागील दोन वर्षांच्या जमा-खर्चाच्या आकडेवारीवरून हा प्राथमिक अहवाल सादर केला आहे.

बिले गायब?
ही गावे महापालिका हद्दीत आली असली, तरी अनेक ग्रामपंचायतीकडून महापालिकेत ही गावे येण्यापूर्वी सुरू असलेल्या कोणत्या कामांची देय शिल्लक आहेत त्याची माहितीच पालिकेस देण्यात आलेली नाही. या शिवाय, काही ग्रामपंचायतीकडून बिलांच्या स्वाक्षरी असलेल्या प्रति अजूनही देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेस वित्त विभागास या गावांचा हिशोबही करता आलेला नाही. त्यामुळे या गावांच्या सादर करण्यात आलेल्या सध्याच्या आर्थिक स्थितीच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात फेरफार होण्याची भीती वर्तविण्यात आली आहे.