पुणे । महापालिका हद्दीत 11 गावांच्या समावेशाची प्रकिया अखेर राज्य शासनाने सुरू केली आहे. त्यासाठी या गावांची लोकसंख्या, क्षेत्रफळ, रिकामे क्षेत्र तसेच गावांच्या समावेशामुळे शहराची वाढणारी लोकसंख्या, सुधारीत हद्द यासंबधीची सविस्तर माहिती राज्य शासनाने महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांकडून मागविली आहे.
हद्दीलगतच्या 34 गावांचा समावेश पुणे महापालिकेत करावा यामागणीसाठी हवेली तालुका सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर राज्य शासनाने न्यायालयात दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पहिल्या टप्यात 11 गावांचा समावेश करण्याचा तर उर्वरीत गावांचा पुढील तीन वर्षात टप्याटप्प्याने समावेश केला जाईल, असे म्हटले होते. तसेच येत्या डिसेंबरपुर्वी 11 गावांच्या समावेशाची अधिसूचना काढण्यात येईल, असेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार आता राज्य शासनाने या गावांच्या समावेशाच्या प्रक्रियेसाठी पाऊले उचलली आहेत.
ज्या 11 गावांचा पालिकेत समावेश होणार आहे. त्यांची सविस्तर माहिती नगरविकास विभागाने महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविली आहे. त्यामध्ये वाढीव हद्दीचे गावनिहाय क्षेत्र व एकूण क्षेत्र, गावांचा समावेश झाल्यानंतर शहराचे एकूण होणारे क्षेत्रफळ, अंशत: समाविष्ट होणार्या 9 गावांचा महापालिका हद्दीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रस्तावित गावनिहाय सर्व्हे नंबर व गटनंबर, गावनिहाय लोकसंख्या, गावांच्या समावेशानंतर शहराची होणारी वाढीव लोकसंख्या, सुधारीत हद्द, रिकाम्या क्षेत्रांचा तपशिल व कृषक जमिनीचे क्षेत्रफळ (हेक्टर आर) व अकृषक जमिनीचे क्षेत्र अशी सविस्तर माहिती मागविली आहे. ही माहिती येत्या आठ दिवसात महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना द्यायची आहे.