11 गावांतही राबविणार स्मार्टसिटी प्रकल्प!

0

पुणे । महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या अकरा गावांमध्येही स्मार्टसिटी प्रकल्प राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या संदर्भात पुणे स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या (पीएसडीसीएल) संचालक मंडळाच्या आगामी बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गावांना चांगल्या पायाभूत सुविधा पुरविता येणार असून, त्यासाठी राज्य सरकारकडून निधीची मागणी केली जाणार आहे.

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेच्या निकषानुसार एरिया डेव्हलपमेंटसाठी औंध-बाणेर-बालेवाडी भागाची निवड करण्यात आली आहे. या भागातील विकासकामांसाठी 2 हजार कोटी खर्च केला जाणार असून त्यामध्ये तब्बल 34 प्रकल्पांचा समावेश आहे. स्मार्टसिटी प्रकल्पासाठी हद्दवाढ करण्याचा विचारही सुरू आहे. जागेच्या कमतरतेमुळे शहरातील पेठ परिसरांमध्ये स्मार्टसिटी प्रकल्प राबविण्यात अडचणी येणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर पालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांना स्मार्टसिटी प्रकल्पात सामावून घेण्याचा विचार केला जात आहे. स्मार्टसिटी प्रकल्पातील योजना नव्याने समाविष्ट गावांमध्ये प्रभावीपणे राबविता येऊ शकतात. तसेच, ग्रामस्थांनाही पुरेशा सोयी-सुविधा मिळतील, या उद्देशाने हा प्रस्ताव तयार करण्यात येत असून संचालक मंडळाच्या 4 डिसेंबरच्या बैठकीत त्यावर चर्चा होणार आहे, असे सांगण्यात आले.