सेवा ज्येष्ठतेचा मिळणार नाही लाभ : आयुक्तांनी काढले अंतिम आदेश
पुणे : महापालिकेत दीड वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील 500 कर्मचारी अखेर कायम स्वरूपी महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले आहेत. याबाबतचा अंतिम आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काढला आहे. मात्र, या कर्मचार्यांना सेवा ज्येष्ठेचे फायदे मिळणार नसून त्यांची सेवा ज्येष्ठता ही गावे महापालिकेत समाविष्ट झालेल्या दिनांकापासून गृहीत धरण्यात येणार आहे.
4 ऑक्टोबर 2017 मध्ये महापालिका हद्दीत ही गावे समाविष्ट झालेली होती. या गावांमध्ये जवळपास 536 कर्मचारी कार्यरत होते. हे सर्व कर्मचारी महापालिकेत घेण्यात आले होते. मात्र, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता, त्यातील अनेक कर्मचारी काही महिन्यांपूर्वी रुजू करून लगेचच कायमस्वरूपी झाले असल्याचे समोर आले होते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने 31 डिसेंबर 2016 पूर्वीच्याच कर्मचार्यांना पालिकेच्या सेवेत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, एकूण कर्मचार्यांमधील 134 कर्मचारी वगळण्यात आले असून 2 कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत. त्यानंतर महापालिका प्रशासनाने या कर्मचार्यांचा अंतिम प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला होता. अखेर आयुक्तांनी त्यास मान्यता दिली असून हे 500 कर्मचारी पालिकेच्या सेवेत कायम असणार आहेत.
सेवा ज्येष्ठतेला मुकणार
दरम्यान, आयुक्तांनी काढलेल्या आदेशात या कर्मचार्यांची सेवा ज्येष्ठता महापालिकेत गावे समाविष्ट आलेल्या दिनांकापासून गृहीत धरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही गावे पालिकेत येण्यापूर्वी कर्मचार्यांची जी सेवा झाली आहे ती सेवा ज्येष्ठतेत गृहीत धरली जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्याचवेळी या कर्मचार्यांची पालिकेत येण्यापूर्वीची सेवा त्यांना वेतना व्यतिरिक्त देण्यात येणार्या इतर आर्थिक सुविधांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे पदोन्नतीला मुकावे लागणार असले तरी, इतर आर्थिक लाभ मिळणार असल्याचे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.