पुणे । महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 11 गावांमधील मिळकतकर वसुली महापालिकेने पुन्हा सुरू केली आहे. ही गावे पालिकेत आल्यानंतर तेथील करभरणा ठप्प होता. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या सर्व गावांच्या ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये कर भरण्यासाठी संगणक यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार, सोमवारपासून या गावांमधील नागरिकांना कर भरता येणार असल्याची माहिती महापालिका करसंकलन विभाग प्रमुख विलास कानडे यांनी दिली.
कर भरणा बंद
राज्यशासनाच्या आदेशानुसार, ही 11 गावे 5 ऑक्टोबरपासून महापालिकेच्या ताब्यात आल्यानंतर पालिकेकडून त्यांचे सर्व दप्तरही ताब्यात घेण्यात आले आहे. या ग्रामपंचायतींनी मिळकतकराची बिले नागरिकांना वितरीत केलेली आहेत. त्यानुसार, ग्रामपंचायतीकडे कर भरला जात होता. मात्र, ही गावे पालिकेत आल्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून नागरिकांनी कर भरणे बंद केलेले आहे. त्यामुळे या करापासून महापालिकेस मिळणारे उत्पन्नही बंद झालेले आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाकडून या ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार, नागरिकांकडून ऑनलाइन, रोख रक्कम, डीडी तसेच धनादेशाद्वारे कर स्वीकारला जाणार आहे.
जुन्या बिलांनुसारच कर आकारणी
या गावांसाठीची कर आकारणी यावर्षी ग्रामपंयाचतीच्या कराच्या दरानुसार महापालिका वसूल करणार आहे. त्यानंतर पुढील वर्षापासून नवीन बिले ग्रामस्थांना दिली जाणार आहे. त्यासाठी या गावांमधील मिळकतींची नोंदी असलेली रजिस्टर तसेच बांधकाम परवान्यांची माहिती संकलीत करण्यात येत आहे, अशी माहिती कानडे यांनी सांगितले.