रत्नागिरी : अखेर वातानुकूलित शिवशाहीला धावण्याचा मुहूर्त मिळाला असून ती 11 जूनपासून रत्नागिरी आगारातून धावणार आहे. तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी वातानुकूलित ‘शिवशाही’ बससेवा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार 11 जूनपासून रत्नागिरी आगारातून प्रत्यक्षात या सेवेला प्रारंभ होत असून, भाडेतत्त्वावर घेण्यात येणार्या या बसला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
याबाबतची माहिती देताना रत्नागिरी विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितलेे की, विभागातील रत्नागिरी आगारातून एसटीकडून प्रथमच रत्नागिरी ते मुंबई अशी वातानुकूलित सेवा देण्यात येणार आहे. यासाठी रत्नागिरी आगाराला शिवशाही एसटी बस मिळाल्या असून, ही बस रत्नागिरी येथून रात्री 10 वा. सुटून मुंबई येथे पहाटे 5 वा. पोहचेल तर मुंबई येथून रात्री 9.45 वा. सुटल्यानंतर रत्नागिरीत पहाटे 4.45 वा. पोहचेल.
एसटीतील सुविधा
एसटीच्या ताफ्यात दाखल करण्यात आलेल्या शिवशाही बस संपूर्ण वातानुकुलित असून, 45 आसनी आहेत. यामध्ये प्रवाशांना बसण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, यामध्ये प्रत्येक आसनासाठी एलईडी स्क्रीन आणि एफएमवरुन गाणी ऐकण्यासाठी स्वतंत्र हेडफोनची सुविधा देण्यात आली आहे. याचबरोबर प्रवाशांना वाचन करण्यासाठी सोयीस्कर हेडलॅम्प, आसन मागे-पुढे करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवशाही एसटीचा तिकीट दर रत्नागिरी ते मुंबई 546 रुपये, संगमेश्वर ते मुंबई 474 आणि चिपळूण ते मुंबई 410 असा आहे.
500 बस टप्प्याटप्प्याने धावणार
खासगी वाहतूकदार आरामदायी बस गाड्यांच्या तिकिटात सवलत देतात. त्यामुळे एस.टी.च्या प्रवासी संख्येत घट होत असल्यामुळे एसटीने या शिवशाही बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल 500 बस या राज्यभर टप्याटप्याने सुरू केल्या जाणार आहेत. राज्यातील विविध शहरांसाठी शिवशाही बस सेवा सुरू झाल्यानंतर खासगी बस गाड्यांचे प्रवासी एसटीच्या शिवशाहीकडे वळतील, अशी मंडळाला आशा आहे.