चाळीसगाव तालुक्यातील घटना ; माणुसकीला काळीमा फासणारी घटना
जळगाव : चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथील अल्पवयीन 11 वर्षीय नातीच्या वयाच्या बालिकेसोबत वृध्दाने अश्लिल चाळे करुन विनयभंग करुन माणुसकीला काळीमा फासणारी घटना 16 जून 2018 रोजी घडली होती. या खटल्यात न्यायालयाने दोषी धरून आरोपी भिमराव पाटील (80 रा. कळमडू ता. चाळीसगाव) याला पाच वर्ष सक्तमजूरीची शिक्षा तसेच पाच हजार रूपये दंड सुनावला. जिल्हा न्यायालयाचे न्या. आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयाने शनिवारी हा निकाल दिला.
काय घडला होता प्रकार
16 जून 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता पिडीत ही संशयित भिमराव पाटील (80) याच्या चक्कीवर हरबर्याची डाळ दळायला गेली असता बालिकेशी त्याने अश्लील
चाळे करून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पिडीतेच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला गुरन 68/18 भादवी कलम 354 व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 7,8 व 9 अन्वये संशयीत आरोपीविरूध्द गुन्हा दाखल झाला होता. तपासाधिकारी हेमंत शिंदे यांनी गुन्हयाच्या तपासाअंती दोषारोपपत्र दाखल केले.
पाच साक्षीदार तपासले
या खटल्याचे चौकशीच्या कामकाजाला न्यायाधीश आर.जे. कटारिया यांच्या न्यायालयात सुरूवात झाली. सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. यात पिडीत अल्पवयीन मुलीची साक्ष ही खुप महत्वपूर्ण ठरली. समोर आलेल्या साक्षीपुराव्याअंती न्यायालयाने भादवी दोषी ठरवून आरोपी भिमराव पाटील याला भादवी कलम 354 व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम 7,8, व 9 खाली पाच वर्ष सक्तमजुरी तसेच 05 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. चारूलता बोरसे यांनी कामकाज पाहिले. या कामी पैरवी अधिकारी सहा. पोलीस उपनिरीक्षक शालीग्राम पाटील यांची मदत लाभली. सरकार पक्षाने युक्तीवादात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाड्यांचा आधार घेत आजोबा सदृश्य माणसाकडून नातीच्या वयाच्या लहानग्या मुलीसोबत केलेले कृत्य हे समाजात नात्यांच्या व माणुसकीच्या छबीला काळीमा फासणारे आहे, हा मुददा प्रभावीपणे मांडत साक्षीपुरावे सादर केले.