११ वर्षांपूर्वी झालेल्या बॉम्ब स्फोट प्रकरणी आज निकाल

0

हैदराबाद – गेल्या अकरा वर्षांपूर्वी हैदराबाद येथील गोकूळ चाट आणि लुंबिनी पार्क येथे दोन शक्तिशाली बॉम्ब स्फोट झाले होते. यात तब्बल ४२ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आज या खटल्याचा अंतिम निकालाबाबत सुनावणी होणार आहे.गेल्या सात ऑगस्टला खटल्यातील सर्व दावे आणि प्रतिदावे ऐकल्यानंतर, सत्र न्यायाधीश श्रीनिवास राव यांनी निकालासाठी २७ ऑगस्ट ही तारीख निश्चित केली होती.

याप्रकरणी चार जणांवर खटला सुरू आहे. हा खटला नामपल्ली न्यायालयातून चेरापल्ली मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात असलेल्या न्यायालयात हलविण्यात आला होती. या खटल्यात न्यायदंडाधिकाऱ्यांनी ऑगस्ट २०१३ मध्ये अनिक शफिक सईद, मोहंमद सादिक, अकबर ईस्माईल चौधरी आणि अंन्सार अहमद बादशहा शेख या चार जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. या चौघांवरही इंडियन मुजाहिदीनचे हस्तक असल्याचा आरोप आहे.

हे चारही आरोपी सध्या चेरापल्ली मध्यवर्ती कारागृहात आहेत. खटल्याच्या सुनावनीदरम्यान १७० साक्षीदारांची तपासणी आणि उलट तपासणी करण्यात आली. या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास काऊंटर इंटेलिजन्स या तेलंगणा पोलिस विभागाने केला होता. या हल्ल्यामागील काही आरोपी अजूनही फरार आहेत.

गेल्या २५ ऑगस्ट २००७ रोजी एकाच वेळी हैदराबाद शहरात दोन बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते. पहिला बॉम्ब स्फोट लुंबिनी पार्क येथे तर दुसरा लगेचच पाच मिनिटानंतर प्रसिद्ध गोकूळ चाट भांडार येथे झाला होता. या स्फोटात तब्बल ४२ जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर ५४ जण जखमी झाले होते. या हल्ल्यामागे हरकत – उल – जिहाद – अल – इस्लाम या बंदी घालण्यात आलेल्या बागलादेशी दहशतवादी संघटनेला प्राथमिक अहवालात जबाबदार धरण्यात आले होते.