110 दालमिल चालकांचा जीएसटीला विरोध

0

जळगाव । वस्तु व सेवाकर (जीएसटी) विरोधात शुक्रवारी शहरातील 110 दालमील बंद ठेवण्यात आल्या होत्या. दालमील असोसिएशनच्या नेतृत्वात हा बंद पाळण्यात आला. त्यामुळे 2500 कामगारांचा रोजगार बुडाला तसेच अंदाजे 30 कोटींची उलाढाल ठप्प झाली. 1 जुलै रोजी दालमील नियमित सुरू राहतील अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम कोगटा यांनी दिली आहे. तर जीएसटीमध्ये ब्रॅण्डेड डाळींवर पाच टक्के कर लावला असून हा कर मागे घेण्यात यावा अशा मागणीसाठीही हा एकदिवशीय बंद पुकारण्यात आला होता.

ब्रॅण्डेड डाळींवरील कर मागे घ्या..
वस्तू व सेवा करानुसार (जीएसटी) वस्तू, साहित्याच्या विक्रीसंबंधी शहरातील 15 हजार विविध दुकानदार, व्यावसायिकांनी आपले जमाखर्चाचे सॉफ्टवेअर बदलले आहेत. आता मूल्यवर्धीत कराऐवजी जीएसटीनुसार ग्राहकांना संगणकीकृत बिले दिले जातील. दालमिल मालकांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी 30 कोटींची उलाढाल ठप्प झाली. 1 जुलैपासून दुकानदाराला ग्राहकाला बिल देताना ग्राहकाचा जीएसटी क्रमांक, ईमेल, पूर्ण पत्ता आदी माहिती घ्यावी लागेल. तसेच केंद्रीय दर निश्चिती समितीने सूचित केल्यानुसार (निर्देशीत वस्तू दर यादी) संबंधित वस्तूवर जीएसटी आकारावा लागेल. आतार्पयत व्हॅट आकारला जायचा. त्यामुळे विविध जमाखर्च सॉफ्टवेअरमध्ये व्हॅटनुसार रचना केली होती. पण ही रचना जीएसटीमुळे बदलावी लागली आहे. जमाखर्च सॉफ्टवेअरमध्ये मोठे बदल केले असून, हे सॉफ्टवेर शहरातील दुकानदार, व्यावसायिकांनी बसवून घेतले. दरम्यान, 1 जुलै रोजी दालमील नियमित सुरू राहतील अशी माहिती कळविण्यात आली आहे.