112 फूट उंचीच्या शिवमुद्रेचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण

0

कोईंबतुर । देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोईंबतुरमध्ये भगवान शंकराच्या सुमारे 112 फूट उंच असलेल्या शिवमुद्रेचे अनावरण केले. आदियोगी शिवाच्या रूपातली ही मूर्ती धर्मगुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनने घडवली आहे. पंतप्रधानांच्या हस्ते या मूर्तीचे अनावरण होताच जगभरात करण्यात येणार्‍या महायोग यज्ञाला सुुरुवात करण्यात आली. या यज्ञाच्या माध्यमातून पुढील महाशिवरात्रीपर्यंत सुमारे 10 कोटी लोकांना योगाभ्यास शिकवण्याचा संकल्प ईशा फाऊंडेशनने सोडला आहे. या अनावरण सोहळ्यांनतर फाऊंडेशनच्या वतीने साजर्‍या करण्यात येणार्‍या महाशिवरात्री महोत्सवाची सुरुवात झाली. सुमारे 12 तास चाललेल्या या महोत्सवात जग्गी वासुदेव यांचे प्रवचन आणि ध्यानधारणा झाली. याशिवाय बॉलिवुडमधील गायक कैलाश खेरसह अनेक गायकांनी हजेरी लावली. त्यांच्या जोडीला ईशा फाऊंडेशनचे गायक आणि नर्तकांनीही कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाचे 23 सॅटेलाईट वाहिन्यांवरून सात भाषांमध्ये प्रसारण करण्यात आले.

सर्वसाधारणपणे मोठ्या उंचीचे पुतळे घडवण्यासाठी दगडाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. मात्र, ही शिवमुद्रा घडवण्यासाठी स्टीलच्या तुकड्यांचा वापर करण्यात आला आहे. खुद्द जग्गी वासुदेव यांनी या शिवमुद्रेचे रेखाटन केले असून, कुठल्याही स्वरूपातील चेहरा असलेली जगातील सर्वात मोठी प्रतिमा असल्याचा दावा ईशा फाऊंडेशन केला आहे. या शिवमुद्रेच्या जोडीने तयार करण्यात आलेल्या नंदीच्या प्रतिमेसाठी तिळांचे बी, हळद, भस्म, वाळू आणि मातीचा वापर करण्यात आला आहे.

जमीन लाटल्याचा आरोप
शिवमुद्रेची स्थापना करण्यासाठी ईशा फाऊंडेशनने जमीन बळकावल्याचा आरोप राज्यातील विविध मानवाधिकार संघटना, राजकीय पक्ष, शेतकरी आणि सामाजिक संस्थांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोंदीच्या हस्ते शिवमुद्रेचे अनावरण केल्यामुळे ही जमीन इशा फाऊंडेशनला दिली गेल्याचा आरोप होत आहे. ही मुद्रा स्थापन करण्यासाठी चेन्नईतील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट अनेक कायद्यांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीने केला. पंतप्रधानांनी या कार्यक्रमाला यायला नव्हते पाहिजे, असेही त्यांनी पुढे सांगितले.