कोसगावला आगीत घरासह दोन खळे भस्मसात ; लाखाचे नुकसान

0

यावल- तालुक्यातील कोसगाव येथे सोमवारी दुपारी शॉर्ट सर्किटने खळवाडीस आग लागली तर आगीने रौद्र रूप धारण गेल्याने काही अंतरावरील घरालाही आगीची झळ बसल्याने सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले. कोसगाव येथील हरी कृष्णा महाजन यांच्या खळ्यातील गुरांचा चारा, शेती अवजारे संपूर्ण जळून खाक झाला तर राजू पंढरीनाथ महाजन यांचे खळ्यातील गुरांचा चारा, सहा बिघ्याची ठिबक, 200 फुट केसींग पाईप (10 पीस), 52 पत्रांचा शेड जळून खाक झाल्याचे सांगण्यात आले.

अग्निशमन बंबाचे शर्थीच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण
सोसाट्याचा वारा सुरू असल्याने आगीने उग्र रुप धारण केले. ग्रामपंचायतच्या वॉटर सप्लायतर्फे नळाद्वारे ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावल तहसीलदार कुंदन हिरे यांनाही माहिती कळवल्यानंतर त्यांनी तत्काळ फैजपूर नगरपालिकेला कळविले. अग्निशामक बंब कोसगावला पाठवण्यात आला. आगीची झळ मधुकर ढेमा सपकाळे यांच्या घरालाही बसली. घरातील गहू, ज्वारी, धान्य, कपडे व संसारोपयोगी साहित्य आगीत भस्मसात झाले. पाडळसे वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक इंजिनिअर योजना चौधरी यांनी कोसगावला येवून वीजपुरवठा बंद केला. फैजपूर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबानेही दाखल घेत आगीवर नियंत्रण मिळवले. अन्यथा 10-12 घरांचेही नुकसान झाले असते. तलाठी योगीता पाटील यांनी आगीत भस्मसात झालेल्या घटनास्थळी येवून नुकसानीचा पंचनामा केला. सहा लाखांच्या जवळपास नुकसानीचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.