भुसावळ । येथील नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांचा वाद आता कॅबिनपर्यंत पोहचला असून जनाधार पक्षातर्फे आपल्या गटनेत्याला दिलेली कॅबिन ही महिला वा बालकल्याण सभापतींना दिल्यामुळे गुरूवारी गांधीगिरीच्या मार्गाने निषेध करत मुख्याधिकार्यांच्या फलकास हार घालण्यात आला.
जोरदार घोषणाबाजी
येथील गेल्या तीन महिन्यापासून जनाधार विकास पक्षाच्या गटनेत्यांनी मुख्याधिकार्यांच्या कॅबिनला लागून असलेल्या कॅबिनवर आपल्या पदाचा फलक लावला होता. याबाबत सत्ताधार्यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार नोंदविली होती. मात्र काल महिला दिनाचे औचित्य साधून गटनेत्याच्या कॅबिनची फलक उतारुन बालकल्याण महिला बालकल्याण सभापतीसाठी विरोधी गटनेत्याने बनविलेले कॅबिन हे सभापतीसाठी मुख्याधिकारी यांनी रितसर पंचनामा करुन देण्यात आले. यामुळे गुरुवारी 12 वाजेच्या सुमारास जनाधार पक्षाचे गटनेता व नगरसेवक यांनी पालिकेच्या मुख्य द्वारावर कारकुनी टेबल ठेवून मुख्याधिकारी तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्या संदर्भात घोषणाबाजी करण्यात आली. यानंतर मुख्याधिकार्यांचे कॅबिन बंद असल्यामुळे कॅबिन बाहेरील फलकास पुष्पहार अर्पण करुन या प्रकाराचा निषेध नोंदविला. आंदोलनाची माहिती कळताच पालिकेत पोलीसांनी धाव घेतली. याप्रसंगी गटनेता उल्हास पगारे, जगन सोनवणे, पुष्पा सोनवणे, नितीन धांडे, जाकीर शेख, आशिक खान, पवन नासे, रवि सपकाळे, इमरान बागवान, वसीम तडवी, छोटू निकम, संजय जाधव, राहुल तावरे, प्रदीप देशमुख, शुभम वारके, सिकंदर खान, हरीश सुरवाडे, सत्तार कुरेशी, राहुल पाटील, अमोल कोळंबे, राजेश बहिरुणे आदी उपस्थित होते.
मुख्याधिकार्यांकडून पंचनामा
इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कॅबिनचा अधिकार्यांनी पंचनामा केला. यात एक टेबल, 12 खुर्च्या व महापुरुषांच्या प्रतिमा आढळून आल्या. मुख्याधिकारी बाविस्कर व कार्यालय अधिक्षक अख्तर खान यांनी खोलीचा ताबा घेतला. यावेळी पंच म्हणून राजेश बतरा व श्रावण कोळी उपस्थित होते. जनाधार पार्टीचे गटनेता यांना पालिकेने कोणतेही नोटीस न देता कार्यालयातील साहित्य बाहेर काढले. महापुरुषांच्या प्रतिमेची कोणतीही पुजा न करता प्रतिमा काढल्याचा आरोप जनाधार पार्टीचे गटनेता पगारे यांनी केला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षाला कोणत्याच प्रकारचे कॅबिन देण्याची कायद्यात नोंद नसून त्यांनी बेकायदेशीरपणे चेअरमनला दिलेली कॅबिन बळकावल्याचा आरोप उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी केल्यामुळे आता हा वाद चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.