पाच वर्षापासून जिल्हा न्यायालयात कामकाज ; राज्यातील सर्वात संवेदनशील व मोठा खटला
जळगाव – जळगावच्या रेणुका इंडस्ट्रीजमध्ये छापा टाकून सुमारे मुंबई विभागातील डीआरआयच्या अधिकार्यांनी 14 डिसेंबर 2013 मध्ये 118 कोटी रुपये किंमतीचे केटामाइन या अंमली पदार्थाचा साठा जप्त आला होता. या प्रकरणी 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. राज्यातील सर्वात संवेदनशील आणि मोठी घटना असलेला खटल्यात जिल्हा न्यायालयाचे न्या. एस.जी.ठुबे यांनी 12 संशयितापैकी सात आरोपींना वेगवेगळ्या कलमान्वय दोषी धरले असून पाच जणांना दोषमुक्त केले आहे. या खटल्याचा सोमवारी 22 एप्रिल रोजी या खटल्यात शिक्षेवर कामकाज होणार आहे.
काय आहे हे प्रकरण
याबाबत माहिती अशी की, जळगाव औद्योगिक वसाहतीतील रुखमा इंडस्ट्रीज येथे छापा टाकून डीआरआय पथकाने 13 डिसेंबर 2013 रोजी मध्यरात्री छापा टाकून 1175 किलो केटामाइन जप्त केले. जागतिक बाजारपेठेत त्याची किंमत 118 कोटी रुपये आहे. उमाळा शिवारात आणि रूखमा इंडस्ट्रीजचे नितीन चिंचोले आणि मुंबईस्थित विकास पुरी हे अंमली पदार्थ निर्मिती व तस्करीचे सूत्रधार असल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास आले होते. गुन्हा दाखल झाल्यापासून सुरूवातीला पोलिसांनी सहा जणांना अटक करण्यात आली होती. मास्टरमाइंड विकास पुरी हा मुख्य सुत्रधार होता. विकास पुरीने औषधशास्त्र विषयात एम.टेक. केले असून या क्षेत्रातला तो तज्ज्ञ मानला जात होता. त्याच्या व्हीसी फार्मा आणि स्पेशालिटी केमिकल या दोन कंपन्या रत्नागिरी येथे आहेत.
घरझडतीत आरोपींच्या घरात सापडले कोट्यवधीचे घबाड
उमाळा व धुळे येथे केटामाईनचा साठा पकडल्यानंतर डीआरआय पथकाने संशयित आरोपींच्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची रोकड व दागिने आढळून आले. बॅँकांच्या लॉकरमधील रक्कम व दागिनेही पथकाने जप्त केले होते. विकास पुरी याच्या घरातून 1 कोटी 20 लाख, विक्रोळी येथील कार्यालयातून 4 लाख रुपये रोख व कागदपत्रे, दुसजया पथकाने डोंबिवली नागरी सहकारी बॅकंच्या लॉकरमधून खेमा झोपे याच्या लॉकरमधून 25 लाख रुपये रोख, नितीन चिंचोले याच्या जळगाव पीपल्स बॅँकेच्या लॉकरमधून भारतीव व परकीय चलन असलेले साडे अकरा लाख रुपये, चिंचोलेचा विश्वासू असलेला मिठाराम सावळे याच्या घरात साडे चार लाख रुपये, विलास चिंचोले याला मिळालेल्या 12 लाख रुपयांपैकी दीड लाख रुपये रोख व 362 ग्रॅम सोने पत्नीच्या लॉकरमधून जप्त करण्यात आले. खेपा झोपे याने शालक किशोर वारके याला दिलेली 12 लाख रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली होती.
अटकेपासून सर्व संशयित कारागृहातच
याप्रकरणी वरूण कुमार तिवारी, गौरी प्रसाद पाल दोन्ही रा. विकरोली मुंबई, नित्यानंद थेवर (वय 27) रा. धारावी मुंबई, कांतीलाल उत्तम सोनवणे रा. जळगाव, जी. श्रीनिवास राव, विकास पुरी रा. पवई मुंबई, खेमा मधुकर झोपे रा. अंबरनाथ ठाणे, विकास रामकृष्ण चिंचोलो रा. जळगाव, नितीन चिंचोली रा. आदर्श नगर, रजनिश ठाकूर सिकंदराबाद, एस.एम.संथिककुमार मैलापूर, चेन्नई आणि विशाल सोमनाथ पुरी रा. जनकपुरी नवी मुंबई अशा 12 संशयित आरोपींवर नार्कोटिक ड्रग्स अॅण्ड सायकोट्राफिक सबस्टन्स अॅक्ट 1985 नुसार गुन्हा दाखल झाला होता. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय तसेच जिल्हा न्यायालय अशा सर्व न्यायालयात संशयितांचे जामीनअर्ज नामंजूर करण्यात आल्याने अटक झाल्यापासून सर्व संशयित कारागृहातच आहे.
हे सात संशयित ठरले दोषी
पाच वर्षापासून जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एस.जी. ठुबे यांच्या न्यायालयात हा खटला सुरु आहे. या खटल्यात आत्तापर्यंत 44 साक्षीदार डीआरआयतर्फे तपासण्यात आले. व आरोपी विकास पुरीतर्फे सहा साक्षीदार बचावार्थ तपासण्यात आले. याप्रकरणात आत्तापर्यंत न्यायालयात जवळपास 550 विविध कागदपत्रांची पुर्तता करून चौकशी तपासणी करण्यात आली आहे. न्या. ठुबे यांनी 12 संशयितांपैकी वरूणकुमार तिवारी, श्रीनिवास राव, विकास पुरी, खेमा मधुकर झोपे, नितीन चिंचोली, रजनिश ठाकूर, एस.एम.शिंथीलकुमार या 7 जणांना दोषी ठरविले आहे.
या संशयितांना केले दोषमुक्त
उर्वरित चालक गौरीप्रसाद पाल, चाल नित्यानंद थेवर , कांतीलाल सोनवणे, विशाल सोमनाथपुरी, विकास चिंचोले या 5 जणांना दोषमुक्त केले आहे. 22 एप्रिल रोजी निकालावर कामकाज होणार आहे. डीआरआयतर्फे विशेष सरकारी वकील अॅड. अतुल श्रीराम सरपांडे, जळगाव येथील सरकारी वकील अॅड. संभाजी जाधव आणि अॅड.खुशाल परमार, मुंबई यांनी कामकाज पाहिले तर आरोपीतर्फे अॅड. अकिल इस्माईल, अॅड. हिम्मत सुर्यवंशी, अॅङ प्रविण पांडे, अॅड.उपासणी, अॅड. एस.के. कौल व अॅड. विजय दर्जी यांनी कामकाज पाहिले.
कलम, कलम निहाय शिक्षा
कलम 8 (सी) म्हणजे अंमली पदार्थाची निर्मिती करणे, विक्री करणे, ताब्यात बाळगणे, खरेदी विक्री करणे, वापर करणे, उपभोग घेणे, आयात निर्यात करणे,
कलम 22 (सी) हे शिक्षेचे कलम असून त्यानुसार जास्तीत जास्त 20 वर्ष, व 2 लाख रुपये दंड, कमीत कमी 10 वर्ष व 1 लाख रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.
कलम 23 (सी) हे शिक्षेचे कलम असून यानुसार जास्तीत जास्त 20 वर्ष, व 2 लाख रुपये दंड, कमीत कमी 10 वर्ष व 1 लाख रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.
कलम 25- मालक किंवा भोगवटादार अथवा ताब्यातील घर, जागा, प्लॉट, कंपनी आदींचा अंमली पदार्थ निर्मिती, साठा करण्यासाठी, खरेदी,विक्रीसाठी, वापर करणे
कलम 29 कटकारस्थान, प्रोत्साहान देणे, यातही वरीलप्रमाणे शिक्षेची तरतूद आहे. 27 (अ) गुन्ह्यासाठी पैसा पुरविणे, फायनान्स करणे, वरील प्रमाणे सर्व कलमान्वये संशयितांना दोषी धरण्यात आले आहे.