धुळे । जिल्हा पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी गेल्या अनेक वर्षांपासून धुळे शहरात ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापित व वशिलेबाज पोलिसांना जिल्हांतर्गत बदल्यांच्या माध्यमातून चांगलाच दणका दिला. 12 वर्षे शहरात ठाण मांडून बसलेल्या पोलीस कर्मचार्यांची शहराबाहेरील तालुक्यांच्या ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्यांमध्ये बदली केली आहे. एकाच पोलीस ठाण्यात 5 वर्षे सेवा बजावलेल्या कर्मचार्यांची इतरत्र बदली करण्यात आली. जिल्ह्यांतर्गत 366 कर्मचार्यांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक रामकुमार यांनी दि 22 रोजी रात्री उशिरा काढले. संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष लागून असलेल्या ‘त्या’ वादग्रस्त 17 पोलिसांना पोलीस मुख्यालयात नियुक्त करण्यात आले आहे. या बदल्यांमध्ये कुठलीही वशिलेबाजी किंवा राजकीय दबाव न चालल्याने पोलिसांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पोलिसांच्या कामाचा अभ्यास
पोलीसदलात मे महिन्यात कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात येतात. त्यात सहायक पोलीस उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, पोलीस नाईक व पोलीस शिपाई अशा दर्जाचे अधिकारी, कर्मचार्यांचा समावेश असतो. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी पदभार स्विकारल्यानंतर सर्वात आधी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांच्या बदल्यांचे नियोजन हाती घेतले. प्रामाणिक व वादग्रस्त पोलिसांच्या कामाचा अभ्यास करुन त्यांनी काल रात्री 9 ते 10 वाजेच्या सुमारास बदल्यांचे आदेश काढले. यात 308 कर्मचार्यांची प्रशासकीय कारणास्तव, विनंतीवरुन 14 जणांची तर तैनात असलेले 44 कर्मचारी अशा एकूण 366 पोलीस कर्मचार्यांच्या जिल्ह्यातंर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत एक कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्यात पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व गृह विभागाचे पोलीस उपअधीक्षक देविदास गवळी याचा समावेश होता. या कमिटीने चर्चा करून अंतिम यादी तयार केली. दरम्यान, गेल्या 12 वर्षांपेक्षा अधिक काळ शहरातच ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापित व वशिलेबाज पोलीस कर्मचार्यांची शहराबाहेरील तालुक्यांच्या पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. एकाच पोलीस ठाण्यात 5 वर्षे सेवा बजावलेल्या कर्मचार्यांचीही इतरत्र बदली करण्यात आली.
‘त्या’ 17 पोलिसांना मुख्यालयात नियुक्ती!
धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक देवीदास शेळके यांनी तत्कालीन अधीक्षक चैतन्या यांच्याकडे बेशीस्त व कर्तव्य न बजावणार्या 14 पोलिसांच्या लेखी तक्रारी केल्या होत्या. यानंतर चैतन्या यांनी त्या 14 पोलिसांच्या तातडीने पोलीस मुख्यालयात तात्पुरती नियुक्ती केली होती. तसेच शिरपूर, मोहाडी आणि शहर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक अशा तीन पोलिसांच्याही तक्रारी असल्याने त्यांच्या पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली होती. या पोलिसांविषयी चैतन्या एस. यांच्याकडे अनेक तक्रारी झाल्या होत्या. यामुळे नवीन अधीक्षक एम.रामकुमार यांनी सर्वसाधारण बदल्यांमध्ये ‘त्या’ वादग्रस्त 17 पोलिसांना पोलीस मुख्यालयात नियुक्ती देत त्यांना झटका दिल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. राज्यातील 175 सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या झाल्या आहेत. त्यात जिल्ह्यातील तीन अधिकार्यांचा समावेश आहे.