12 गावांवर टंचाईचे सावट

0

बोदवड। दरवर्षी पाणीटंचाईच्या ज्वाळांनी होरपळणार्‍या बोदवड तालुक्यात यंदा काहीसी दिलासादायक स्थिती आहे. पावसाच्या शेवटच्या टप्प्यात वरुणराजाची बर्‍यापैकी कृपा झाल्याने तालुक्यातील भूजल पातळी वाढण्यास मदत झाली. तरीही प्रशासनाने 12 गावांमध्ये पाणीटंचाई डोके वर काढू शकते, असे गृहीत धरून उपाययोजनांचे नियोजन केले आहे. त्यावर सर्व मिळून 27 लाख 4 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

बोदवड तालुका अवर्षण प्रवण भागात येतो. शिवाय मोठी नदी किंवा धरणाचा अभाव असल्याने येथील पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे पर्जन्यावर आधारित आहे. चांगला पाऊस झाल्यास टंचाईची तीव्रता कमी होते. मात्र, पावसाने ताण दिल्यास उन्हाळा बोदवडकरांसाठी असह्य ठरतो. सुदैवाने यंदा चांगले चित्र असले तरी जिल्हा प्रशासनाच्या अनुमानानुसार तालुक्यातील 12 गावांमध्ये टंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा प्रशासनाने नियोजनाचा भाग म्हणून टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. त्यात मार्चअखेरपर्यंत वडजी, वरखेड बुद्रूक, चिंचखेड प्रबो, जुनोने दिगर, कुर्‍हा हरदो, शेवगे बुद्रूक, आमदगाव, वराड बुद्रूक, वराड खुर्द, चिखली बुद्रूक, शेवगे बुद्रूक, घाणखेड या गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये प्रत्येकी एक विहीर अधिग्रहित करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकी 48 हजार असे सर्वमिळून 5 लाख 28 हजार रुपये खर्च होणे नियोजित आहे.

पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार जून 2017 पर्यंत विविध 24 योजना राबवणार आहोत. त्यासाठी 27 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, गतवर्षी चांगल्या पावसाने यंदा टंचाईची तीव्रता कमी राहण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच जलचक्र बुद्रूक, जलचक्र खुर्द, पळासखेडा बुद्रूक, वाकी येथेही उपाययोजना होतील.

10 विंधन विहिरी
टंचाईत दिलासा मिळावा यासाठी इतर उपाययोजनांप्रमाणेच नाडगाव येथे दोन विंधन विहिरी होतील. याशिवाय सुरवाडे बुद्रूक 2, सुरवाडे खुर्द 2, वरखेड बुद्रूक, येवती, बोरगाव, मुक्तळ येथे प्रत्येकी एक अशा 10 विंधन विहिरींचे नियोजन आहे. यासाठी 6 लाख, तर तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेतून हरणखेड, येवती, एणगाव येथे कामे होतील.

दुसरा टप्पा कठीण
पाणीटंचाईच्या दुसर्‍या टप्प्यात म्हणजेच एप्रिल ते जून 2017 या कालावधीत हरणखेड, येवती, रेवती, मानमोडी, धोंडखेडा, वरखेड खुर्द, पळासखेडा खुर्द, वाकी, मुक्तळ, एणगाव येथे प्रत्येकी एका विहिरीचे अधिग्रहण होईल. त्यासाठी एकूण 3 लाख 24 हजार खर्च अपेक्षित आहे.