भुसावळ । शहरातील प्रमुख रस्त्यांलगत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढलेले आहे. यामुळे रहदारीची समस्या तर कायम असून यासाठी पालिका प्रशासनाने पाऊले उचलून मंगळवार 12 रोजीपासून तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहिम शहरातील विविध भागात राबविण्यात येणार आहे. यावल रस्त्यावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्यापासून अतिक्रमण हटाव मोहिमेला प्रारंभ होईल. एकाचवेळी पालिकेचे 200 कर्मचारी अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात करतील. अतिक्रमण हटवण्यासाठी तीन जेसीबी आठ ट्रॅक्टर अन्य साहित्य तैनात असणार आहे. कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण न होण्यासाठी शहरातील तगडा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात येणार आहे. 50 पोलिसांसह दोन निरीक्षक व चार सहाय्यक निरीक्षक दर्जाचे अधिकारी तैनात असतील. बाजारातील अनेक दुकानदारांनी त्यांच्या दुकानाबाहेर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने कापडी शेड, लाकडी शेड, पत्री शेड लावून त्यात साहित्य ठेवले असून व्यवसाय करत आहेत.
रस्त्यांवर दुकाने थाटल्याने वाहतुकीचा खोळंबा
मध्यंतरी पालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहिम हाती घेतल्यानंतर मुख्यत्वे जामनेर रोडवरील जवळपास सर्वच अतिक्रमणे हटविण्यात आली होती. यानंतर काही दिवसातच येथे पुनश्च अतिक्रमणे उभारण्यास सुरवात होऊन आता ठिकठिकाणी अतिक्रमणे दिसत आहेत. यामुळे पालिकेचा कारभार थंड्या बस्त्यात गेल्याची चर्चा होती. प्रमुख बाजारपेठेतील रस्ते देखील अरुंद असल्यामुळे तसेच दुकानांमधील वस्तू, पार्क करण्यात आलेली बेशिस्त वाहने यामुळे अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होत होता. त्यामुळे पुन्हा ही मोहिम राबविण्यात येत आहे.
येथे होणार कारवाई
शहरातील आरपीडी रोडसह जळगाव रोड, यावल रोड, खडका रोड, जामनेर रोड तसेच गोपाळ नगरातील खुल्या मैदानावरील अतिक्रमण हटणार आहे शिवाय म्युन्सीपल हायस्कूलसमोरील किशोर नेहेते यांच्या घरासमोरील, जनता टॉवर तसेच सर्वे क्रमांक 297 मधील पालिकेच्या घरकुलांमध्ये रहिवाशांनी केलेले अतिक्रमण हटवण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी बी.टी.बााविस्कर यांनी दिली. वर्दळीच्या रस्त्यावरील अनेक दुकानदारांनी टपर्या, शेडस्, वेदरकोट तसेच पक्के बांधकाम करून पालिकेचे रस्ते अडवले आहेत त्यामुळे ते देखील हटवले जाईल. अतिक्रमणातील जप्त साहित्याचा लिलाव होवून खर्च वसुल होईल.
नोटीस नुसार कारवाई
पालिकेने शहरातील दुकानदारांना यासंदर्भात नोटीस बजावली आहे. नगरपालिकेच्या जागेवर सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बांधकामे करून अतिक्रमण करण्यात आले आहे. खासगी जागेवर अनधिकृत बांधकामे केलेली असून त्यांना कायदेशीररीत्या नोटीस बजावण्यात आली आहे. ओपन स्पेसमधील अतिक्रमण, नगरपरिषद अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण इत्यादी अनधिकृत अतिक्रमण केलेले आहे. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत. अनेकदा नागरिक व दुकानदारांमध्ये वाद होत असतात.