इस्लामाबाद । पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये अटक झालेला भारतीय नागरिक शेख नबी अहमद मुंबईच्या जोगेश्वरीचा रहिवासी आहे. पाकिस्तानने रविवारी त्याला अटक केली. पण धक्कादायक बाब म्हणजे 2005 पासून तो पाकिस्तानाच आहे. मुंबई पोलिसातील एका वरिष्ठ अधिकार्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नबी मागील 12 वर्षांपासून पाकिस्तानात आहे, तर आवश्यक कागदपत्रे नसल्याच्या आरोपातून पाकिस्तान सरकार त्याला आताच का अटक केल्याचे दाखवत आहे? असा प्रश्न तपास यंत्रणांना पडला आहे. इतकेच नाही तर शेख नबीवे दशकभर पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयसाठी काम केले असून अर्धा डझन भारताविरुद्धच्या कारवायांमध्ये त्याचा हात होता. काश्मीरमधून पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न फसल्यानंतर तो बांगलादेशमार्गे पाकिस्तानात पोहोचला होता, असेही अधिकार्याने सांगितले.
2006 लाच एका दहशतवाद्याकडून झाला होता खुलासा
पोलीस अधिकार्यानुसार, 2006 मध्ये गुलबर्गामध्ये एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशीनंतर महाराष्ट्र एटीएसने जोगेश्वरीतील सुमारे डझनभर लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याचवेळी तीन लोक बेपत्ता होते. यामध्ये शेख नबीही होता. तो 2005 पासून बेपत्ता होता. ज्या डझनभर लोकांना पकडले होते, त्यांना त्यांच्या आई-वडिलांसमोर समज देऊन सोडण्यात आले. पण महाराष्ट्र पोलिसांच्या विविध तपास यंत्रणा नबीसह मोठा इम्रान आणि छोटा इम्रान या दोन साथीदारांचा शोध घेत होत्या. पाकिस्तानी सीमा ओलांडताना जम्मू काश्मीर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मोठा इम्रान जखमी झाला होता. त्याआधी तिथल्या पोलिसांनी, नंतर यूपी पोलिसांनी त्याची कस्टडी घेतली होती.
12 वर्षांपासून रोज पोलीस शोधतात नबीला
दरवर्षी आमचे पथक नबीच्या घराजवळ खबरी पाठवत असे. आमच्या माहितीनुसार, तो मागील 12 वर्षात मुंबईत कधीच आला नाही. पाकिस्तानने त्याच्या ज्या फ्लॅटचा पत्ता दिला, तिथे पाच वर्षांपासून सोळंकी कुटुंब भाड्याने राहत आहे. तपासात समोर आले की, जोगेश्वरमध्ये राम मंदिर रोडवर त्याच्या कुटुंबाचे एक घर आहे, पण ते घरही भाड्याने दिले आहे, असे पोलीस अधिकार्याने सांगितले. शेख नबी 12 वर्षांपासून बेपत्ता आहे. स्थानिक पोलिस जवळपास दररोज शेख नबीच्या शोधात त्याच्या घरी येतात. त्यामुळे कुटुंबीयांनी आपल्या घराचा पत्ताच बदलला आहे. पण नबीचे कुटुंब महाराष्ट्रातच राहते.
नबीवर अनेक गुन्हे दाखल
शेख नबी आपल्या कुटुंबासह जोगेश्वरीमध्ये एका छोट्या घरात राहत असे. या परिसरात लोक त्याला ताज नावाने ओळखत असते. शेख नबीवर मुंबई पोलिसात गुन्हेगारी प्रकरणे दाखल आहेत. त्यामुळे पोलीस सातत्याने त्याच्या घरी चौकशीसाठी येतात. 2006 च्या रेल्वे स्फोट आणि औरंगाबाद शस्त्रास्त्रे प्रकरणातही पोलीस त्याचा शोध घेत होते.