नवी दिल्ली- भारत,चीन आणि रशिया या देशात बारा वर्षांनंतर त्रिपक्षीय चर्चा झाली असून त्यात बहुदेशीय संस्थांमध्ये सुधारणा कार्यक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले. संयुक्त राष्ट्रे, जागतिक व्यापार संघटना या संस्थात सुधारणांची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. खुली जागतिक अर्थव्यवस्था व बहुपक्षीय व्यापार प्रणालीचा फायदा आर्थिक वाढ व भरभराटीसाठी व्हायला हवा अशी अपेक्षा देखील यावेळी व्यक्त करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तसेच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात ही त्रिपक्षीय चर्चा झाली. जी २० देशांच्या शिखर बैठकीच्या पाश्र्वभूमीवर ही चर्चा करण्यात आली. रशिया, भारत व चीन यांच्यातील त्रिपक्षीय चर्चा ही उत्तम झाली असून भारताच्या बाजूने मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी अनेक विषयांवर उहापोह झाला. तत्पूर्वी मोदी, अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व जपानचे पंतप्रधान शिन्झो अॅबे यांच्यातही त्रिपक्षीय चर्चा झाली.
पुतिन, मोदी व जिनपिंग यांनी आपसातील सहकार्यावर विचार मांडले. दोन्ही देशात संपर्कही वाढवण्यात येणार आहे. ब्रिक्स, एससीओ, एएएएस या संघटनांच्या माध्यमातून वेळोवेळी प्रयत्न करून सहकार्य वाढवले जाईल. दहशतवाद, हवामान बदल यासारख्या प्रश्नांवर तोडगा काढण्यावर या देशांचे मतैक्य झाले आहे.