120 कोटी सुधारित वाढीव निधीला मान्यता

0

महापौरांच्या चर्‍होली प्रभागात 100 कोटी
पिंपरी-चिंचवड :  महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पाचे कामकाज पालिकेने सुरु केले आहे. मात्र, सत्ताधार्‍यांनी गतवर्षीच्या अर्थसंकल्पीय तरतूदीत सर्वसाधारण सभेत 120 कोटी रुपयांची सुधारीत वाढीव निधीला मान्यता दिली. अर्थसंकल्पातील रस्ते विकसित करण्याच्या कामासह वाढीव कामे व सुधारीत रकमांचा महापालिका सभेत उपसूचनांद्वारे मान्यता देण्यात आली. महापौर नितीन काळजे यांच्या चर्‍होली प्रभागात 100 कोटींची कामे करण्यात येणार आहेत.

चर्‍होलीत ही होतील कामे
साई मंदिर, कोतवालवाडी, चर्‍होली गावठाण, वडमुखवाडी, सर्व्हे क्रमांक 519 ते 457 पर्यंतचा 30 मीटर विकास आराखड्यातील रस्ता, चोविसावाडी आणि वडमुखवाडीतील 18 मीटर रस्ता विकसित करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 19 कोटी रुपये प्रशासकीय मान्यता होती. या कामांसाठी उपसूचनेद्वारे तब्बल 85 कोटी रुपयांची सुधारित वाढीव प्रशासकीय मान्यता दिली. पिंपळे गुरव येथील दापोडी पूल ते तुळजाभवानी मंदिर ते सृष्टी चौकापर्यंतच्या 18 मीटर रुंद रस्त्याच्या नूतनीकरणास 10 कोटी प्रशासकीय मान्यता आहे. मात्र, या कामाला 20 कोटी रुपये वाढीव मान्यता दिली.

थेरगाव मैदानासाठी जादा 1 कोटी
थेरगावातील विकास आराखड्यातील खेळाचे मैदान विकसित करण्यासाठी मूळ अर्थसंकल्पीय रक्कम तीन कोटी होती. त्यामध्ये एक कोटी वाढ करून चार कोटींची सुधारित मान्यता दिली. चिंचवड, उद्योगनगर, प्रेमलोक पार्क, दळवीनगरात नवीन पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. या कामाचा आदेश गेल्या वर्षी दिला होता. प्रभाग रचना बदलल्याने भाटनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, शिवनगरी या भागात पाण्याच्या समस्या असल्याने पाइपलाइन टाकण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जुन्या कामातून या भागात नवीन पाइपलाइन टाकण्याची उपसूचना मंजूर केली.

चर्‍होलीत पेव्हिंग ब्लॉक
भक्ती-शक्ती चौक ते किवळे-मुकाई चौक बीआरटीएस कॉरिडॉरमध्ये शिंदेवस्ती येथे उड्डाणपुलातील अडथळा ठरणार्‍या वाहिन्या हटविण्यासाठी पाच कोटींची रक्कम होती. ती रक्कम सात कोटी रुपये करण्यास मान्यता दिली. चर्‍होली, मोशी येथील विकासकामांची मूळ अर्थसंकल्पातील जागा बदल करून काम करण्यास मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार भोसलेवस्ती ते पठारेमळा 18 मीटर रस्त्यासंदर्भातील कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता 95 लाख रुपये होती. त्याऐवजी प्रभागातील विविध ठिकाणी पेव्हिंग ब्लॉक व स्थापत्य विषयक काम करण्यात येणार आहेत.

रस्ते विकास
चर्‍होली फाटा रस्ता ते चोविसावाडी, वडमुखवाडी 18 मीटर रस्ता विकसित करण्यासाठी 23 लाख रुपये सुधारित प्रशासकीय मान्यता आहे. मोशीतील डुडुळगाव-केळगाव पुलासाठी विकास आराखड्यातील रस्ता तयार होणार असून, त्यासाठी 75 लाख रुपये, तर चर्‍होली ते डी. वाय. पाटील कॉलेजपर्यंतचा 30 मीटर रुंदीचा रस्ता डांबरीकरणासाठी 85 लाख रुपये सुधारित प्रशासकीय मान्यता आहे.