120 मिळकतधारकांना पत्र : अतुल गाडगीळ यांची माहिती

0

पुणे : पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या 60 मीटर अंतरापर्यंतच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट (इमारत सुरक्षा तपासणी) केले जाणार आहे. 120 मिळकतधारकांना महापालिकेने यासाठीचे पत्र दिल्याची माहिती वनाज ते धान्यगोदाम आणि रेंजहिल्स ते स्वारगेट या भुयारी मार्गांचे प्रभारी प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी दिली.

रेंजहिल्स ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग पूर्णत: भुयारी मार्ग असून त्याचे अंतर साडेसात किलोमीटरचा असेल. या मार्गाचे काम 2 टप्प्यांत केले जाणार आहे. त्यात रेंजहिल्स ते बुधवार पेठ (फडके हौद) हा पहिला टप्पा असून दुसरा टप्पा फडके हौद ते स्वारगेट असा असणार आहे. या मार्गाचे काम टनेल बोअरिंग मशीनद्वारे सुरू केले जाणार असून जमिखाली सुमारे 25 ते 28 मीटर खोलवर हे काम होणार असून या मार्गात दोन बोगदे असतील. त्यामुळे या दोन्ही मार्गांपासून 60 मीटर अंतरापर्यंत जमिनीवर असलेल्या सर्व बांधकामांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार
आहे. त्यानंतरच खोदाई सुरू केली जाणार आहे. यासाठी या भागातील नागरिकांना पत्र पाठवून हे ऑडिट करू देण्यासाठी विनंती केली जात असल्याचेही गाडगीळ यांनी सांगितले.

असे होणार ऑडिट

महामेट्रोकडून केल्या जाणार्‍या या ऑडिटमध्ये प्रत्येक इमारतीच्या सर्व भागांचे फोटो घेतले जाणार आहेत. त्यात प्रत्येक भिंत, प्रत्येक खोली, स्वच्छतागृहापासून पार्किंग, प्रत्येक पिलरचे हाय रिझुलेशन फोटो घेतले जाणार आहेत. याशिवाय, संबंधित इमारतीच्या बांधकामाचीही तपासणी केली जाणार आहे. त्यात इमारतीचे बांधकाम किती सुरक्षित आहे? बोअरिंगचे काम सुरू केल्यानंतर इमारतीला कितपत धोका आहे? याची तपासणी तज्ज्ञ करणार आहेत. त्यामुळे काम सुरू झाल्यानंतर अथवा काम झाल्यानंतर मेट्रोमुळे नुकसान झाल्याची तक्रार एखाद्याकडून आल्यास या ऑडिट माहितीच्या विश्‍लेषणावरून सुरक्षा उपाययोजना केल्या जाणार आहेत.

तीन टप्प्यांत होणार काम

महामेट्रोकडून हे सर्वेक्षण दोन टप्प्यांत केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात या कामाची सुरुवात रेंजहिल्स ते शिवाजीनगरपर्यंत करण्यात येणार आहे. तर दुसर्‍या टप्प्यात शिवाजीनगर ते फडके हौदापर्यंत आणि तिसर्‍या टप्प्यात फडके हौद ते स्वारगेटपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. पुढील तीन महिन्यांत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण केले जाणार आहे.