125 कलाकारांची महाआरती आणि अथर्वशीर्ष पठण

0

पुणे । महापालिका यंदा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाचे वर्ष साजरे करीत आहे. यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा एक भाग म्हणून गुरुवारी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपतीची महाआरती 125 नामवंत कलाकारांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी कसबा गणपती मंदिराच्या परिसरात कलाकारांची मांदियाळी जमली होती.

पुण्यातील यंदाचा गणेशोत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करतोय. आणि त्या निमित्ताने महापालिका हा गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा करीत आहे. जगाच्या नकाशावर पुण्याच्या उल्लेखनीय ठसा उमटवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आज गणपती अथर्वशीर्षाचे पठण करण्यात आले.

यावेळी शहरातील चित्रपट,नाट्य ,कला, साहित्य आणि संगीत क्षेत्रातील अभिनेते-अभिनेत्री, गायक, वादक, नर्तक, रंगभूमीवरील रंगकर्मी, तंत्रज्ञ, निवेदक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संयोजक-आयोजक आणि व्यावसायिक यांनी यावेळी राहुल सोलापकर, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, शास्त्रीय गायक आनंद भाटे, कीर्ती गायकवाड, हरी आंबेकर, कल्याण गायकवाड, सुनील गोडबोले, राधा कुलकर्णी, राहुल बेलापूरकर, पूजा पवार, मेघराज भोसले आदी कलाकार उपस्थित होते. अ.भा.मराठी चित्रपट महामंडळ, अ.भा. मराठी नाट्य परिषद-पुणे आणि कोथरूड शाखा, महाराष्ट्र साहित्य परिषद, एकपात्री कलाकार, शाहीर परिषद, बालगंधर्व परिवार, लोककला-लावणी निर्माता व कलावंत संघ, नाट्य निर्माता संघ, ऑर्केस्ट्रा निर्माता संघ, साउंड लाइट जनरेटर संस्था या संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद या महाआरतीमध्ये सहभागी झाले.