125 कलाकारांची महाआरती व अथर्वशीर्ष पठण!

0

शतकोत्तर रौप्य महोत्सवी उपक्रमांना शुभेच्छा देण्यासाठी रंगकर्मीचा पुढाकार

पुणे – पुण्यातील गणेशोत्सव शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे. या सोहळ्यातील अनेक उपक्रमांपैकी दोन उपक्रमांची नोंद थेट ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये होणार आहे. त्यातील एक म्हणजे शाडू मातीचे पर्यावरणपूरक गणपती शालेय विद्यार्थ्यांकडून विक्रमी संख्येने एकाच वेळेस बनविले जातील. दुसरा म्हणजे हजारो तरुण-तरुणी ढोल-ताशा वादक वादनाविष्कार सादर करतील! महापालिकेच्या या महत्त्वाकांक्षी विश्‍वविक्रमी उपक्रमांना शुभेच्छा देण्यासाठी विविध क्षेत्रांतील 125 नामवंत कलाकारांच्या हस्ते गुरुवारी (दि. 24) सायं. 5 वा. ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची महाआरती आणि श्री अथर्वशीर्षाचे पठण होणार आहे.

शहरातील चित्रपट, नाट्य, कला, साहित्य आणि संगीत क्षेत्रातील अभिनेते-अभिनेत्री, गायक, वादक, नर्तक, रंगकर्मी, तंत्रज्ञ, निवेदक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संयोजक-आयोजक आणि व्यावसायिक गणेशोत्सव शांततेत, निर्विघ्नपणे, एकोप्याने आणि सुरक्षितपणे पार पडावा म्हणून एकत्रितपणे साकडं घालतील. पुण्याचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी या कलाकारांसह अनेक संस्थासुद्धा पुढे आल्या आहेत.

या नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार होऊन महापालिकेच्या या उपक्रमांना शुभेच्छा देण्याचे आवाहन विविध संस्थांनी आणि रंगाकर्मींनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी मेघराज राजेभोसले (अध्यक्ष-अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ), सुरेश देशमुख (अध्यक्ष-नाटय परिषद), सुनील महाजन (नाट्य परिषद, कोथरूड शाखा), मकरंद टिल्लू (एकपात्री संघटना), शेखर गरुड (ऑर्केस्ट्रा), शैलेश नांदूरगिकर (साहित्य परिषद), मिलिंद जोशी (कार्याध्यक्ष-साहित्य परिषद), मोहन दामले (चित्रपट निर्माते), समीर हंप्पी (नाटय व्यवस्थापक), सत्यजित धांडेकर (नाट्य व्यवस्थापक), गौतम कांबळे (साउंड लाईट जनरेटर संस्था) हे उपस्थित होते.