12700 नव्हे 29000 कोटींना चुना

0

पीएनबी घोटाळ्याची लूट वाढली

नवी दिल्ली : बारा हजार सातशे कोटींचा नव्हे, तर तब्बल 29 हजार कोटी रूपयांचा पीएनबी घोटाळा असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. काँग्रेस सरकार आणि मोदी सरकार अशा दोन्ही सरकारच्या कार्यकाळात हा घोटाळा झाला. विशेष म्हणजे, या घोटाळ्यासाठी जी पद्धत वापरली त्यामधून आणखी प्रश्‍न उपस्थित होत आहेत. पीएनबी घोटाळा 29 हजार कोटांचा असून, यातील नऊ हजार कोटींचा घोटाळा काँग्रेस तर 20 हजार कोटी रूपये मोदी सरकारच्या काळात लूटले गेले आहेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांच्या संशोधनातून पुढे आली आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात सुरुवात
पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा 2011 पासून सुरू झाला, तेव्हा सत्तेवर काँग्रेस सरकार होते. 2011 साली 50 एलओयूच्या माध्यमातून 750 कोटी रूपये, 2012 साली 100 एलओयूच्या माध्यमातून 2300 कोटी रूपये, 2013 साली 250 एलओयूच्या माध्यमातून 4000 कोटी रूपये, आणि 2014 साली 125 एलओयूच्या माध्यमातून 2000 कोटी रूपये, असा काँग्रेस सरकारच्या काळात पीएनबी घोटाळा झाला. भाजप म्हणजेच मोदी सरकारच्या काळात 20 हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाला. काँग्रेस सरकारच्या काळात सुरू झालेला हा घोटाळा मोदी सरकारच्या काळातही थांबला नाही. तो घोटाळा 29 हजार कोटींवर पोहोचला. पीएनबीच्या कागदपत्रांचा तपास सीबीआय, ईडी आणि सीरियस फ्रॉड इन्व्हिस्टिगेशन ऑफिस (एसएफआयओ), प्राप्तिकर विभाग करत आहेत.