13 जणांवर तडीपारची कारवाई

0

नारायणगाव । आळेफाटा पोलिस ठाण्यांतर्गत गणेशोत्सव व बकरी ईदसारखे सण शांततेत पार पाडावेत, यासाठी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता हद्दीतील व परिसरातील 13 जणांवर आळेफाटा पोलिसांनी तडीपारीची कारवाई केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक मारुती खेडकर यांनी दिली.

पोलिस अधीक्षक सुवेज हक, उपविभागीय पोलीस अधिकरी जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर विभागाचे प्रांताधिकारी अजय देशमुख यांच्या आदेशाने 23 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2017 या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये जुन्नर तालुक्यातून तेरा जाणांना तडीपार करण्यात आले आहे. यामध्ये बेकायदेशीररित्या डीजे, डॉल्बी वाजविल्याबद्दल संदीप हरिभाऊ निलख, शैलेश बाळू जाधव, चाँद मणियार खान पठाण, सागर दत्तात्रय बाह्मणे व प्राणी संरक्षण व इतर कायद्यान्वये गुन्हे दाखल असलेले सुनील तानाजी कापसे, भाऊसाहेब तुकाराम बांगर, असिफ शफी बेपारी, जाकीर बशीर बेपारी, शाकीर बशीर बेपारी, म्हसू खंडू येलमर, लक्ष्मण म्हसू भंडलकर, कारभारी पंजागा भंडलकर, भिवाजी रामभाऊ भंडलकर यांचा समावेश आहे. या कालावधीत हे आरोप जुन्नर तालुक्यात दिसून आल्यास आळेफाटा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन मारुती खेडकर यांनी केले आहे. आगामी गणेशोत्सव मध्ये डीजे डॉल्बी सारख्या ध्वनी प्रदूषण करणार्‍या डीजे चालक, मालक व डीजे लावणार्‍या गणपती मंडळाच्या अध्यक्षांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच बकरी ईदच्या अनुषंगाने कोणीही बेकायदेशीर जनावरांची वाहतूक, कत्तल करू नये. असे कृत्य करणार्‍यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल, अशा इशारा खेडकर यांनी दिला आहे.