जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांची मागणी
पाणी वाचवणार्या योजना राबवा
पुणे : जिल्ह्यात या वर्षी 1972 साली पडलेल्या दुष्काळासारखी स्थिती आहे. आतापासून पाणी वापरताना काटकसर करणे गरजेचे आहे. यामुळे शासनाने जिल्ह्यातील 13 तालुक्यांत दुष्काळ जाहीर करावा, तसेच टंचाई आराखड्यांच्या कामांसाठी जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केली. कालवा समितीच्या बैठकीत सध्या दोन आवर्तने आणि उन्हाळ्यात 1 आवर्तन देण्यास अनुकूलता दर्शविली आहे, असे असले तरी शेतकर्यांनी पाण्याचे नियोजन करून ठिबक सिंचनासारख्या पाणी वाचवणार्या योजना राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
पाण्याची भीषण टंचाई
जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दौंड, बारामती, इंदापूर, पुरंदर या तालुक्यांत पाण्याची भीषण परिस्थिती आहे. आवर्तनावरच येथील पाणी पुरवठा अवलंबून असतो. शासनाने जिल्ह्यातील केवळ 10 तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहे. मात्र, संपूर्ण 13 तालुक्यात पाण्याची भीषण स्थिती आहे. नद्या, तसेच पाण्याचे अनेक स्त्रोत आतापासूनच कोरडे पडू लागले आहे. यामुळे उन्हाळ्यात गंभीर परिस्थिती राहणार आहे. अशा स्थितीतही पाण्याचे आवर्तन मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
योग्य नियोजन करणे गरजेचे
नुकत्याच मुंबई येथे झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत जलसंसाधन आणि पाटबंधारे खात्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सध्य स्थितीत दोन आवर्तने आणि उन्हाळ्यात तीन आवर्तने देण्याचे मान्य केले आहे. असे असले तरी पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकर्यांनी पिण्याच्या पाण्याला जास्त प्राधान्य द्यावे. पाण्याचा काटकसरीने वापर करावा. यासाठी शेतामध्ये ठिबक सिंचन वापरावे जेणे करून पाण्याची बचत होईल, असे विश्वासराव देवकाते यांनी सांगितले.
तालुकानिहाय बैठका
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती बघता लवकरच तालुकानिहाय बैठका घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत गावातील पाण्याचा आढावा घेऊन काय नियोजन करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील. गेल्या वर्षी टंचाईची अनेक कामे झालीत मात्र, त्यांची बिले अद्यापही मिळालेली नाहीत. यामुळे शासनाने ही बिले त्वरित द्यावी. या बरोबरच दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्ह्याला आणखी निधी द्यावा, अशी मागणीही देवकाते यांनी केली.
सहकार्य करण्याचे आवाहन
उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. आताच ही स्थिती असल्यामुळे उन्हाळ्यात परिस्थिती आणखी वाईट होण्याची शक्यता आहे. शासकीय पातळीवर दुष्काळनिवारणासाठी आतापासूनच तयारी करण्यात येत आहे. येणार्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
विश्वास देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष