पुणे । खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या तुमच्या मुलासंदर्भात महत्वाची कागदपत्र द्यायची असल्याचे सांगून एका ज्यूस विक्रेत्याला भेटण्यासाठी बोलावले आणि कारमध्ये डांबून त्याच्या गळ्यातील 53 तोळे सोन्याचे दागिने लुटून नेणार्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सोन्याचे लॉकेट, अंगठ्या, ब्रेसलेट असा 13 लाख 37 हजार रुपयांचे तब्बल 53.5 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. कर्वेनगर परिसरात गेल्या आठवड्यात भरदिवसा हा प्रकार घडला होता. या टोळीतील अन्य तिघे फरार असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रणजित आनंदराव कांबळे (वय 25) व सचिन हनमंत कुरळे (वय 26, रा. पंढरपूर) अशी त्यांचि नावे आहेत. त्यांचे इतर तीन साथीदार पसार आहेत. याप्रकरणी मुकेश वसंत शेलार (वय 52, रा. गांधी वसाहत, कर्वेनगर) यांनी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
लुटण्याचा रचला कट
शेलार यांच्या मुलाने 2014 मध्ये काही कारणावरून एकाचा खून केला होता. या गुन्ह्यात सध्या तो येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मुकेश शेलार यांचा कर्वेनगर परिसरात ज्यूस विक्रीचा व्यवसाय आहे. आरोपी एकदा ज्यूस पिण्यासाठी गेले असता त्यांनी शेलार यांच्या गळ्यातील दागिने पाहून ते लुटण्याच्या कट रचला. त्यापुर्वी त्यांनी शेलार यांच्या कुटुंबाची सर्व माहिती काढली आणि लुटण्याचा दिवस ठरवला.
चाकुच्या धाकाने लुटले
घटनेच्या दिवशी मुकेश हे नातेवाईकांकडे लग्नाला जाण्यासाठी निघाले होते. त्याचदरम्यान त्यांना फोन आला आणि तुरुंगात असलेल्या तुमच्या मुलासंदर्भात महत्वाची कागदपत्र द्यायची असल्याचे सांगून त्यांना कर्वेनगर परिसरात भेटण्यासाठी बोलावले. शेलार आले असताना त्यांना कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले आणि चाकुचा धाक दाखवत त्यांचे अपहरण करत रोख 50 हजार व 13 लाख 37 हजाराचे दागिने असा 13 लाख 87 हजार किंमतीचा ऐवज काढून घेतला होता.
सापळा रचून दोघांना अटक
या गुन्ह्याचा तपास सुरू असताना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील कर्मचारी प्रणव संकपाळ यांना सोने घेऊन दोघेजण कात्रज बायपास रोड लगत उभे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, परिमंडळ दोनचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, सहायक आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ निरीक्षक कलमाकर ताकवले, निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तात्रय मोहिते, अमोल पवार, कुंदन शिंदे, अभिजीत रत्नपारखी यांनी सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी कर्वेनगर येथील ज्यूस विक्रेते मुकेश शेलार यांना कट रचून साथीदारांच्या मदतीने लुटल्याचे सांगितले. त्यांनी अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का, याबाबात तपास सुरु असून त्यांच्या साथीदारांचा शोध घेतला जात आहे.