रावेर : उधारीचे अवघे 130 रुपये न दिल्याने तरुणाला आपले नाहक प्राण गमवावे लागले. रावेर तालुक्यातील ऐनपूर येथे गुरुवारी रात्री आठ वाजता घडलेल्या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत भीमसिंग जगदीश पवार (28) यांचा मृत्यू झाला असून संशयित पन्नालाल सोमा कोरकू (58) हा पसार झाला आहे निंभोरा पोलिसात गुरुवारी रात्री उशिरा आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
उधारीचे पैसे न दिल्याने तरुणाचा खून
ऐनपूर गावातील वाल्मीक नगरात पन्नालाल कोरकू यांची टपरी असून भीमसिंग पवार यांच्याकडे त्यांचे 130 रुपये उधारीचे बाकी होते. ते देण्यावरून कोरकू यांनी गुरुवारी पवार यांच्याशी वाद घालत पवार यांचे गुप्तांग पिळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गुरुवार, 5 मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली तर संशयित आरोपी पसार झाला.
निंभोरा पोलिसांची घटनास्थळी धाव
या घटनेची माहिती मिळताच फैजपूर विभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, निंभोरा पोलीस स्टेशनचे सहा. निरीक्षक गणेश धुमाळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा निंभोरा पोलिसात संशयित विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास ज्ञानेश्वर चौधरी, स्वप्नील पाटील, अब्बास तडवी करीत आहेत.