1322 कोटींचा नवा घोटाळा!

0

नीरव मोदीने पीएनबीला लावला आणखी एक चुना

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेतील नीरव मोदीचा 11,400 कोटींचा घोटाळ्याने देश हादरला असतानाच, त्याचा आणखी एक महाघोटाळा उघडकीस आला आहे. नीरव मोदीने 1322 कोटी रुपयांचा दुसरा घोटाळा केल्याचे पीएनबीच्या निदर्शनास आले आहे. बँकेच्या ओव्हरसीज शाखेला मिळालेल्या नव्या लेटर ऑफ अंडरटेकिंग्जनंतर हा नवा घोटाळा समोर आला. पीएनबीने स्टॉक एक्सचेंजला नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी 1300 कोटी रूपयांचा आणखी एक घोटाळा केल्याची माहिती दिली. यापूर्वी पीएनबीने नीरव मोदीवर 11,400 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता.

515 कोटींचे आंतरराष्ट्रीय व्यवहार दडवले
नीरव मोदीच्या अवैध व्यवहाराचा आकडा 12,700 कोटी रूपयांपर्यंत पोहोचला असल्याचे पीएनबीने फायलिंगमध्ये स्टॉक एक्सचेंजला कळवले. अन्य एका फायलिंगमध्ये पीएनबीने या घोटाळ्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईची सरकारकडे मागणी केल्याचे फेटाळले आहे. नीरव मोदीच्या कंपन्यांनी आयात-निर्यातीशी संबंधित तब्बल 515 कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय व्यवहार दडवून ठेवले होते. कर चोरी करून करण्यात आलेले हे व्यवहार आता प्राप्तिकर विभागाकडून तपासले जात आहेत. शनिवारी प्राप्तिकर विभागाच्यावतीने नीरव मोदीच्या मुंबईतील एका गोदामातून 150 मौल्यवान चित्रे जप्त केली होती. राजा रवी वर्मा आणि जतीन दास यांसारख्या अत्यंत मान्यवर चित्रकारांची चित्रे यात आहेत. त्यांची किंमत काढण्याचे काम आता प्राप्तिकर विभाग करीत आहे.

परदेशातील संपत्तीची चौकशी करणार
पीएनबी घोटाळ्याचा तपास करणार्‍या ईडी, नीरव मोदीची परदेशातील संपत्ती व व्यवसायाची चौकशी करणार आहे. त्याबद्दल संबंधित देशांकडून माहिती मिळावी, याकरिता ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयाला लेटर ऑफ रोगेटरी देण्याची विनंती केली आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत एलआर काढण्यासाठी ईडीने हा अर्ज केला आहे. हाँगकाँग, यूएसई, युके, यूएई, दक्षिण आफ्रिका आणि सिंगापूर या देशांत नीरव मोदीची संपत्ती आहे. तो या देशांत व्यवसाय करत होता. त्यामुळे या गुुन्ह्यासंबंधी आवश्यक कागदपत्रे संबंधित देशांकडून मिळावी, याकरिता एलआर काढावे, अशी विनंती ईडीने विशेष न्यायालयाला केली.